मुबंई : राज्यातील कृषी पंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना 7 नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता 15 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे चालू वीज बिल 15 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आता भरता येईल.
सोमवार 30 ऑक्टोबर रोजी थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आली होती. त्यासंबंधीचा शासन निर्णय 31 ऑक्टोबरलाच प्रसिद्ध झाला आहे. या मुदतवाढीमुळे 15 नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांचे वीज जोडणी खंडित केली जाणार नाही. तसेच मुद्दल रक्कमेचे पाच हप्ते करण्यात आले असून, मुद्दल रक्कमेचे पाच हप्ते डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत शेतकऱ्यांनी भरायचे आहेत.
ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत वीजबिल वितरीत करण्यात आले नाही, त्या शेतकऱ्यांना महावितरणने त्वरित वीजबिलाचे वाटप करण्याच्या सूचनाही आज दिल्या. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 चा लाभ शेतकऱ्यांनी घेतला तर शेतकऱ्यांचे दंड व्याज माफ होणार आहे.