रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तपासणी नाक्यांची महाराष्ट्र् स्वाभिमान पक्षाकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. जाळपोळ आणि तोडफोड करणारे 10 ते 15 कार्यकर्ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते होते ते स्वाभिमान पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत होते कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वसुली नाके उभे केले आहेत़ या नाक्यावरून सेस वसुलीचे काम केले जाते़ हे काम दिवसरात्र सुरू आहे़ मात्र, शासनाच्या जीआरमध्ये अशी कोणतीच तरतूद नाही़ त्यामुळे हे नाके पोलीस प्रशासनाने दोन दिवसांत बंद करावे़ अन्यथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आपल्या स्टाईलने ते स्वत: बंद करतील, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर आज रत्नागिरीतल्या परटवणे-उद्यमनगर दरम्यान असलेल्या तपासणी नाक्याची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या नाक्यातल्या सामानाची तोडफोड तसेच काही साहित्य जाळण्यात आलं. तसेच कुवारबाव येथील तपासणी नाक्याची तोडफोड करण्यात आली. तसेच या तपासणी नाक्याला कुलूप लावण्यात आलं. 10 ते 15 कार्यकर्त्यांनी हि तोडफोड, जाळपोळ केली. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामे करण्याचं काम सुरु आहे.