
रत्नागिरी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे दत्तात्रय ढवळे यांची तर लांजा येथील संजय आयरे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. शिवसेना, काँग्रेसला संधी दिल्यानंतर आता पुढील तिन वर्षे राष्ट्रीवादी काँग्रेसच्या संचालकांना संधी मिळणार आहे.
मधुकर दळवी यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणुक जाहीर झाली होती. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरीही सर्व पक्षीय संचालकांना पदावर काम करण्याची संधी देण्याचा निर्णय सुरवातीला घेण्यात आला होता. त्यानुसार शिवसेनेतर्फे गजानन पाटील यांना संधी दिली गेली. त्यानंतर काँग्रेसच मधूकर दळवी यांनी एक वर्ष पदावर होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीकडे पुढील तीन वर्षे बाजार समितीचे पद राहणार आहे. त्यानुसार आज ढवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजीमंत्री रवींद्र माने, माजी सभापती दळवी, गजानन पाटील, संचालक जोशी यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
निवडणुक प्रक्रिया झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ढवळे यांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज चालवू असे सांगितले.














