
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी यांच्या सोईसाठी महाराष्ट्र स्पर्धांक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या अद्ययावत लिलाव गृहाचे रविवारी (ता. २८) उद्घाटन करण्यात येणार आहे. राज्याचे सहकार पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्घाटन समारंभाला केंद्रीय मंत्री अनंत गीते, मंत्री रामदास कदम, पालकमंत्री रविंद्र वायकर, खा. नारायण राणे, खा. हुसेन दलवाई, खा. विनायक राऊत, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष तानाजीराव चोरगे, जि.प. अध्यक्षा स्वरुपा साळवी, आ. उदय सामंत, आ. राजन साळवी, आ. संजय कदम, आ. भास्कर जाधव, आ. सदानंद चव्हाण, आ. प्रसाद लाड, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बोलताना दळवी म्हणाले, जिल्ह्यातील आंबा मुंबईतील वाशी मार्केटमध्ये पाठवला जातो. सप्टेंबर २०१३ मध्ये स्पर्धांत्मक कृषी विकास प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात आंबा लिलावासाठी लिलावगृह उभारण्यात यावे यासाठी मी स्वत: उपसभापती असताना पणन मंत्र्यांकडे मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा करून फेब्रुवारी २०१४ ला मंजुरी देण्यात आली. सन २०१६ मध्ये या लिलाव गृहाच्या बांधकामाला सुरुवात होवून ते उद्घाटनासाठी पूर्ण झाले आहे.
शेतकऱ्यांसाठी सन २००९ पासून प्रथमच शेतमाल तारण योजना जिल्ह्यात राबवण्यात आली. बाजार समितीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या योजनेतून ७३ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले. त्यापैकी निम्मे कर्ज शेतकऱ्यांनी फेडले आहे. पुढील वर्षासाठी शेतमाल तारण योजनेसाठी ५ कोटींचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असल्याचे दळवी यांनी सांगितले. दरम्यान, सद्यस्थितीत शेतमाल तारण योजनेत काजू बी चा समावेश असून सुपारी या नगदी पिकाला देखील या योजनेत समाविष्ट करून घेतले असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.
रविवारी (ता. २८) सायं. ३ वा. आयोजित करण्यात आलेल्या छ. शिवाजी महाराज लिलावगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पणन मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या याबाबत चर्चा सत्राचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन दळवी यांनी केले आहे.















