रत्नागिरी, (आरकेजी) : जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास २१ ते २३ जून या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
अनेक दिवसांपासून कृषी सहाय्यक मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. यापूर्वी कृषी साहाय्यकानी १२ ते १४ जून या कालावधीमध्ये कार्यालयात काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला होता. त्यानंतर १५ ते १७ जून या कालावधीमध्ये लेखणी बंद आंदोलनही केले. त्यांच्या कोणत्याही आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्याने आज अखेर आक्रमन पवित्रा घेण्यात आला.
विभागाचा सुधारीत आकृतीबंध त्वरित तयार करण्यात यावा. तो तयार करत असताना कृषी सहाय्यक संघटनेला विचारात घेण्यात यावं. कृषी पर्यवेक्षकांची १०० टक्के पदे कृषी साहाय्यक संवर्गातून भरण्यात यावी. तसेच इतर शासकीय विभागांप्रमाणे कृषी साहाय्यकांना कृषी कृषी पर्यवेक्षकपदी पदोन्नती देण्यात यावी आदी मागण्यासाठी आज आंदोलन केलं.