
आत्मा, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आयोजन
रत्नागिरी : जिल्हा नियोजन समिती, प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यांच्यावतीने दि. १० ते १२ मे रोजी स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजार येथे सकाळी १० ते रात्रौ १० या वेळेत जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषद व पशु-पक्षी प्रदर्शन 2025चे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी तसेच प्रक्रिया धारक, पशुपालक यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले व प्रकल्प संचालक आत्मा विजय बेतीवार यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दि. १० मे रोजी सकाळी १० वाजता कृषी मंत्री अॕड. माणिकराव कोकाटे, तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत, यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषि राज्यमंत्री अॕड. आशिष जयस्वाल, गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य आमदार भास्करराव जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण (भैय्या) सामंत, सिंधुरत्न समृध्द योजना समिती अध्यक्ष दीपक केसरकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरु डॉ. संजय भावे हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये आंबा व शेतमाल उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीचे स्वतंत्र दालन, बचत गटांचे उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री, विविध जातींचे पशू-पक्षी प्रदर्शन, कृषी व कृषी संलग्न विभागांची स्वतंत्र दालने, अत्याधुनिक कृषी यंत्रे अवजारे यांची स्वतंत्र दालने, कृषी निविष्ठा यांची स्वतंत्र दालने, खवय्यांसाठी रूचकर अस्सल कोकणी पदार्थांची मेजवानी अशी एकूण १६५ विविध गट, कृषी व कृषी संलग्न विभागांची प्रशस्त दालने असणार आहेत. या दालनांमध्ये प्राधान्याने जिल्ह्यातील शेतकरी व बचतगट यांना मोफत दालने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
याबरोबरच जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान, कृषी विषयक विविध परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आलेले आहे. तसेच दि. १० मे २०२५ रोजी पौष्टीक तृणधान्ये व पारंपरिक अशा दोन्ही प्रकारात पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.10 मे व 11 मे 2025 रोजी सांयकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजता कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी व कृषी संलग्न विविध योजनांची माहिती व प्रात्यक्षिके या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रदर्शित केले जाणार आहेत.