
रत्नागिरी, (आरकेजी) : जमीन संपादीत केल्याचा दाखला शासनाने बंधनकारक केल्याने कोयना प्रकल्पग्रस्तांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे. ही जाचक अट रद्द करावी, यासाठी प्रकल्पग्रस्तांनी पोफळीत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस होता. पोफळी आणि परिसरातील काही गावांच्या जमिनी कोयना प्रकल्पासाठी गेल्या. परंतु, अद्यापही काही प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचे काहीच मिळालेले नाही.
कोयना प्रकल्पाच्या जागेत महानिर्मितीने कार्यालय थाटले आहे. पण महानिर्मितीत प्रकल्पग्रस्ताना सामावून घेण्यासाठी महानिर्मितीसाठी जमीन संपादीत केल्याचा दाखला शासनाकडून बंधनकारक करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या धोरणामुळे कोयना प्रकल्पासाठी जमीन देणारे शेकडो प्रकल्पग्रस्त अडचणीत आले आहेत. ऊर्जा खात्याने ही अट रद्द करावी, या मागणीसाठी रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त पोफळी येथे उपोषणाला बसले आहेत. पोफळी येथील कोयना हाटड्रो प्रकल्प हा शासनाच्या मालकीचे असून महानिर्मितीने भाडेतत्वावर चालविण्यासाठी घेतला आहे.