
रत्नागिरी : कोयना धरण पुनर्वसनबाबत सातारा तसेच रत्नागिरी आणि इतर तीन जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक लवकर लावून प्रलंबित प्रश्नांबाबत तोडगा काढला जाईल असे राज्य पुर्नवसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी आज येथे एका बैठकीत सांगितले.
राज्य पुर्नवसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी आज एक दिवसाच्या रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यातील प्रलंबित पुनर्वसनाबाबत एका बैठकीत आढावा घेतला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपजिल्हाधिकारी विडके आदींसह विविध प्रकल्पांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
ज्या प्रकरणी शासनाने भूसंपादन केलेले आहे त्या प्रकल्पांमधील पुनर्वसनासाठी शासन बांधिल आहे, असे सांगून भंडारी म्हणाले की, ज्या पुनर्वसनात गावठाणांचे स्थलांतर होणे निश्चित झाले आहे. त्याबाबत स्थानिक सुविधांची कामे पूर्ण झाली असल्यास ती जिल्हा परिषदेस त्वरित हस्तांतरीत करावीत आणि जिल्हा परिषदेनेही ती ताब्यात घ्यावीत.
ज्या गावठाणांसाठी पुनर्वसन क्षेत्रात जागा देण्यात आलेली आहे आणि अद्याप भूखंडावर बांधकाम झालेले नाही अशा सर्व बाबतीत बांधकामे पंतप्रधान आवास योजनेत होण्याबाबत प्रस्ताव सादर करुन त्याचा पाठपुरावा करण्यात यावा असेही ते म्हणाले.
पुर्नवसन प्रलंबित असणाऱ्या प्रकल्पात क्षेत्र मोजणी करण्याच्या कामामुळे पुनर्वसन थांबले आहे अशी स्थिती काही बाबतीत दिसून आली आहे ही मोजणी त्वरित पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही होणे आवश्यक आहे त्यासाठी कालमर्यादा निश्चित करुन कामे करा अशा सूचना भंडारी यांनी दिल्या.















