
मुंबई : परवडणारी तसेच अल्पावधीत इको फ्रेंडली घरे तयार करण्यासाठी आवश्यक असलेली साधन-सामुग्री तयार करण्यासाठी कोरियातील वॉन जी टेक कंपनीने पुढाकार घेतला असून कंपनीच्या प्रतिनिधींनी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन या प्रकल्पासंबंधी सविस्तर चर्चा केली. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत निर्माण होणाऱ्या गृहप्रकल्पांना या कंपनीचा मोठा हातभार लागू शकतो, त्यामुळे या कंपनीला राज्य शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.
इको फ्रेंडली वॉल पॅनल तयार करण्यासाठी कोरियातील वॉनजी टेक कंपनी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात या कंपनीने काम करण्याची तयारी दर्शवली आहे. जांभ्या दगडापासून हे वॉल पॅनल तयार केले जाणार असून कोकणातील रायगड किंवा रत्नागिरी जिल्ह्यात जांभा दगड मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक विकास वसाहतीमध्ये हा प्रकल्प उभा राहू शकतो. त्यासाठी जागा, वीज, पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन श्री. देसाई यांनी दिले आहे.
यावेळी वॉन जी कंपनीचे सीईओ चुंग हून अन, डीओ वेल कंपनीचे संचालक ओ सॅंग सिक, भारतातील कंपनीचे प्रतिनिधी रवींद्र देसाई, यावेळी उपस्थित होते.















