डोंबिवली, (प्रशांत जोशी) : स्थायी समितीचे माजी सभापती व नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या कोपरगांव प्रभागातील भुयारी गटाराचा शुभारंभ खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी रमेश म्हात्रे, डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, परिवहन समिती माजी सदस्य संजय पावशे, बंडू पाटील आदी मान्यवर शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व कोपर मधील हजारो नागरिक उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली शहराच्या नकाशावर भौगोलिकदृष्ट्या कोपर गावास महत्त्व येउ लागले आहे. कोपर रेल्वे स्टेशन हे जंक्शन झाल्यामुळे दळवळण वाढले. त्याचा थेट परिणाम लोकसंख्येवर झाला. कोपर येथे नागरिक घरे खरेदी करु लागले आहेत. वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात नागरी सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवक म्हणून रमेश म्हात्रे यांनी प्रयत्न सुरु केले आहे. त्यांच्याच प्रयत्नामुळे गावा मध्ये विकासाच्या पाउलखुणा उमटु लागल्या आहेत. पायाभूत सुविधा सोबत मलनिस्सारण, पावसाच्या पाण्याचा निचरा होणे यासाठी भूमीगत गटार योजनेस प्राधान्य देण्यात येत आहे.
रमेश म्हात्रे यांनी प्रभागात अनेक विकास कामे गेल्या कित्येक वर्षात केलेली आहेत. या भूमीगत गटारांमुळे नागरिकांना सुरक्षित आरोग्याची हमी मिळणार आहे. म्हात्रे यांना प्रशासकीय कामाचा अनुभव असल्याने कोपरवासियांना उत्तम नगरसेवक मिळाला आहे अशी प्रशंसा खा डॉ. शिंदे यांनी यावेळी केली.
कोपर गावचे रुप पालटत असून गाव आणि शहर यातली दरी मिटत आहे. मात्र गावचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखून, जुनी घरे यांना अभय देत कोपरचा विकास केला जाणार आहे. इथल्या भूमीपुत्रांनी विकासासाठी केलेल्या त्यागासाठी त्यांना धन्यवाद देत आहे. भविष्यात कोपर बहुआयामी कार्पोरेट शहर म्हणून नावारूपाला येईल त्यावेळेस भूमीपुत्रांना त्यागाचे फळ मिळेल असेही यावेळी रमेश म्हात्रे म्हणाले.