अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार व खून खटल्यातील दोषी आरोपींना अत्याचार व खूनाच्या आरोपाखाली दोषी धरत सत्र न्यायालयाने बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला.
कोपर्डी येथील नववीत शिकणारी निर्भयावर मागील वर्षी १३ जुलै रोजी अत्याचार करण्यात आला. मुख्य दोषी आरोपी पप्पू शिंदे, संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२६) यांनी अत्याचारानंतर तिचा निघृणपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुलीच्या मावसभावाने पोलिसात फिर्याद दिली होती. यावेळी शिंदेला पळताना फिर्यादीने पाहिले होते. त्याची दुचाकीही घटनास्थळी आढळून आली होती. हाच पुरावा घटनेत महत्त्वपूर्ण ठरल्याने विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी तिनही दोषींना फाशी देण्याची मागणी केली.
या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. न्यायालयाने आज पप्पू शिंदे याला अत्याचार, खून व बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार (पोक्सो) दोषी धरले. दोष सिद्ध झाल्याने त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे या दोघांना कट रचणे, गुन्ह्यासाठी प्रोत्साहित करणे या कलमांखाली दोषी धरण्यात आले असून त्यांनाही जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी फाशीची शिक्षा सुनावली.
नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी या घटनेचा तपास करुन घटनेनंतर ८५ दिवसांनी ७ आॅक्टोबर २०१६ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. घटनेनंतर १ वर्षे चार महिन्यांनी निकाल लागला. हा खटला सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी लढविला. जितेंद्र शिंदे याच्यासाठी न्यायप्राधिकरणाने अॅड. योहान मकासरे यांची नियुक्ती केली होती. संतोष भवाळ याच्यावतीने अॅड. बाळासाहेब खोपडे व अॅड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी तर नितीन भैलुमे याच्यावतीने अॅड. प्रकाश आहेर यांनी हा खटला लढविला.
प्रतिक्रिया
पोलिसांनी अतिशय मनापासून या घटनेचा तपास केला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अतिशय व्यवस्थितपणे आमची बाजू न्यायालयासमोर मांडली. त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. न्यायालय आणि न्यायाधीश यांच्यावर आमचा विश्वास होता. तो विश्वास आज सार्थ ठरला. त्यामुळे न्यायाधीशांचेही आभार,’ अशा शब्दांमध्ये कोपर्डी प्रकरणातील निर्भयाच्या आईने तिच्या भावना व्यक्त केल्या.
कोपर्डीची घटना अत्यंत निंदनीय होती. संपूर्ण महाराष्ट्रात त्याची प्रतिक्रिया उमटली होती. आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी राज्यातील माता-भगिनींची भावना होती. न्यायालयाने लवकर आणि चांगला निकाल दिल्यामुळे या महिलांना दिलासा मिळाला आहे. या जलद प्रक्रियेमुळे न्यायालयावरचा विश्वास वाढला आहे. या शिक्षेमुळे अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींना जरब बसून महिलांवरील अत्याचारास पायबंद बसेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गुन्हा नोंदविण्यापासून ते फाशीची शिक्षा होईपर्यंत वेगवान पद्धतीने न्यायदान झाले. या निकालाने कायद्याचे राज्य स्थापित होईल- विजया रहाटकर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग.
कोपर्डी प्रकरणात सुनावलेल्या कठोर शिक्षेमुळे अशा वृत्तींना जरब बसेल- सुप्रिया सुळे














