डोंबिवली : मध्य रेल्वेच्या डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकाच्या मध्ये मुबईकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून पडून आज सकाळी एक तरुण ठार झाला. मयत तरुणाचे नाव शिव वल्लभ गुजर (26) आहे.
शिव वल्लभ गुजर तरुण डोंबिवली पश्चिम रहाणारा होता व मशीद बंदर येथे तो दुकानात कामाला होता. सकाळी त्याने नेहमीप्रमाणे मुंबईकडे जाणारी जलद लोकल पकडली. जलद ट्रेन असल्याने त्याला आत प्रवेश करता आला नाही. डोंबिवलीतून जलद जाणारी ट्रेन कोपर जवळ आली असताना त्याचा खांब क्रमांक 46/23 जवळ त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्याच्या डोक्याला, हात पायाला गंभीर जखम झाली. हे वृत्त लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना समजताच ते पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले व शिव गुजर यास शास्त्रीनगर रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तीन दिवसांपूर्वी कोपर जवळ सविता फकिरा नाईक (30) या तरुणीचा अपघाती मृत्यू झाला होता. गेल्या सहा महिन्यात कोपर स्थानकाजवळ 38 जणांचा अपघाती मृत्यू झाला असून डोंबिवली कोपर व कोपर दिवा हा भाग मृत्यूचे सापळा झाला असल्याचे बोलले जात आहे.