रत्नागिरी, (आरकेजी) : कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या गाड्यांचा वेग उद्या शनिवारपासून मंदावणार आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने नवे वेळापत्रक लागू केले आहे. ते उद्यापासून अमलात येणार आहे.
पावसाळ्यामध्ये रेल्वे मार्गावर दरडी कोसळून कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी दरवर्षी पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांचा वेग कमी केला जातो. यावर्षी सुद्धा गाडय़ांचा वेग कमी करण्यात आला आहे. उद्यापासून ताशी ४० किमी वेगाने मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ा धावणार आहेत. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. मुंबईतून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत लागू राहणार आहे.
कोकणकन्या १०११२ ही मडगाव येथून यापूर्वी ६ वाजता सुटणारी गाडी आता सायंकाळी ४.४५ वाजता सुटून रत्नागिरीमध्ये १० वाजता तर चिपळूणला ११ वाजून ४९ मिनिटांनी पोहचेल. सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस रत्नागिरीत रात्री सव्वानऊ तर चिपळूणला १० वाजून ५४ मिनिटांनी पोहोचेल. इतर गाड्यांच्या वेळापत्रकातही असाच बदल झालेला आहे.