सिंधुदुर्ग : दळणवळणाच्या पायाभूत सुविधा रस्ते विकासासाठी आवश्यक आहेत, त्यामुळेच केंद्र आणि राज्य सरकारने कोकणात पायाभूत सुविधांची १ लाख कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. नियोजनपूर्वक व कालबद्धरितीने होत असलेल्या या कामामुळे येत्या दोन वर्षात कोकणचा कायापालट होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कुडाळ येथे केले.
केंद्र सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचा भूमीपूजन समारंभ आज कुडाळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे होते, तर प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण मंत्री रामदास कदम, पालकमंत्री दीपक केसरकर, बंदरे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खासदार विनायक राऊत, माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, रश्मी ठाकरे उपस्थित होते.
कोकणातील निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण करुन निसर्गाला मान्य असलेला विकास करुन कोकणवासीयांची प्रगती आणि उन्नती साधण्यास राज्य शासनाने सर्वोच प्राधान्य दिल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, कोकणामध्ये निसर्ग, समुद्रकिनारा चांगला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. पर्यटनाला अधिक वाव मिळावायासाठी पंचतारांकित हॉटेल निर्मितीबरोबरच विमानतळ विकासासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे.
कोकणच्या विकासासाठी अधिक संवेदनशील
राज्य व केंद्र शासन कोकणच्या विकासासाठी अधिक संवेदनशील असून कोकणचा विकास परिवर्तन आणि पर्यटन या गोष्टीस प्राधान्य दिले आहे. कोकणातील छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी चांदा ते बांदा या योजनेला गती दिली जाईल, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. या जिल्ह्यात पर्यटन वाढावे यासाठी केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शनमध्ये प्रस्ताव पाठविला असून केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून टुरिस्ट सर्किट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कोकणवासीयांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे असून कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या-ज्या गोष्टी कराव्या लागतील, त्या-त्या प्राधान्यक्रमाने केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोकणात रस्ते, रेल्वे आणि बंदर विकासाचे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवून नव नव्या उद्योगाबरोबरच पर्यटन विकासाला अधिक चालना देऊन रोजगार निर्मिती करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सांगून श्री.फडणवीस म्हणाले, रेल्वे व रस्ते विकासाचे मोठे जाळे निर्माण करुन दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षात अडीचपटीने केले आहे. मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे कोकणवासियांचे, लोकप्रतिनिधींचे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होत असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखून कोकणचा विकास करण्यावर शासनाने अधिक भर दिला आहे. या पायाभूत सुविधामुळे कोकणातील पर्यटन व्यवसाय जगाच्या नकाशावर झळकविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
मुंबई गोवा हा राष्ट्रीय महामार्ग कोकणच्या विकासाकरीता सर्वार्थाने महत्वाचा असल्याचे स्पष्ट करुन श्री.गडकरी म्हणाले, या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 11 पॅकेज तयार केली असून 14 पुलांची कामे सुरु केली आहेत. या महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल केवळ 165 दिवसात पूर्ण केला आहे या कामी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी केले. या महामार्गामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन अनेक लोकांचे प्राण वाचतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले या महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना अधिक मोबदला देण्याची तयारी शासनाने ठेवली त्याकरीता कोकणातील तीनही जिल्हाधिकाऱ्यांकडे 3100 कोटी रुपये दिले असून प्राप्त होतील तसे मोबदला देण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. येत्या तीन महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2018 पर्यंत हा रस्ता पूर्ण केला जाईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
रस्ते, रेल्वे वाहतुकीबरोबरच जलवाहतुकीसही शासनाने प्राधान्य दिले असल्याचे सांगून श्री.गडकरी म्हणाले, आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 154 कि. मी. लांबीचे रस्ते चौपदरीकरणचा कार्यक्रम हाती घेतला असून त्यासाठी 4470 कोटी 72 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सागरीमार्गातील 23 पैकी 18 पूल बांधले असून उर्वरीत जलमार्गाचा विकास केला जात आहे. यामध्ये खाड्या व नद्यांचे जलमार्गात रुपांतर करण्यात येत आहे. महाराष्ट्रासाठी जेवढी बंदरे बांधायची असतील त्यांचे प्रस्ताव द्या त्यांना मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. कोकणातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पेट्रोल, डिझेल ऐवजी एलएनजी इंधन म्हणून वापरणे उपयुक्त आहे. यापुढे इलेक्ट्रीकल, बायोडिझेल तसेच बायो इथेनॉलला मान्यता देऊन वाहतुक करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, कोकणात रेल्वे, रस्ते आणि बंदराच्या विकासाची कामे हाती घेऊन कोकणचा विकास केला जात आहे. यासाठी आवश्यक सर्व पायाभुत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. रेल्वे विकासापासून दुर्लक्षित असलेल्या भागावर अधिक लक्ष केंद्रीत केले असून कोकणला पश्चिम महाराष्ट्र जोडण्याबरोबर वैभववाडी पासून रेल्वेने बंदरे जोडली जातील यासाठी रेल्वे विभाग प्रयत्नशील आहे. राज्यात विशेषः कोकणात पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, कोकणात रस्ते, रेल्वे आणि जलमार्गाचे केंद्र आणि राज्य शासनाने महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोकण हे जगातील पर्यटनाचे केंद्र होईल. कोकणाला लाभलेले समुद्र किनारे, गड किल्ले यांच्या विकासाबरोबरच चौपदरीकरणाच्या कामामुळे कोकणच्या पर्यटनाला नवी दिशा मिळेल.
केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव अजय संगणे यांनी स्वागत केले. खासदार विनायक राऊत यांनी प्रास्ताविक केले. समारंभास कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे, माजी आमदार प्रमोद जठार,अजित गोगटे यांच्या सह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.