नवी मुंबई : ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर जिथे शक्य असेल तिथे झाडे लावावी व लावलेल्या झाडांचे संवर्धन हाेणे अावश्यक अाहे. वृक्ष लागवडीची लोकचळवळ हाेणे ही समाजाची गरज असल्याचे आवाहन वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी केले.सन 2018 च्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस कोकण विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील, कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, वन विभागाचे अधिकारी, सर्व प्रशासकीय विभागाचे प्रमुख आदी उपस्थित होते.श्री. खारगे म्हणाले की, मागील दोन वर्षात जी वृक्ष लागवड केली. त्याचे दृष्यपरिणाम दिसू लागले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या वृक्ष लागवडीपैकी 83 टक्के वृक्ष लागवड यशस्वी झाली आहे. कोकण विभागात भौगोलिक परिस्थितीला अनुसरुनच वृक्षारोपाची निवड करावी, 30 एप्रिल पर्यंत वृक्षरोपणासाठी खड्डे घेण्याचे काम पूर्ण करावे व यावर्षीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वृक्षरोपणाच्या कार्यक्रमात अधिकाधिक लोकसहभाग वाढावा. रानमळा ता.खेड जि.पुणे या गावातील वृक्ष लागवडीचा प्रयोग कोकण विभागात कशाप्रकारे राबविण्यात येईल यांचाही प्रयत्न करावा. कोकणातील कांदळवनाची वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करावा. वृक्षलागवडीचे व संवर्धनाचे लोकचळवळीत रुपांतर व्हावे, म्हणून वन विभागाने महाराष्ट्र हरित सेनेची स्थापना केली आहे. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या चळवळीत सहभागी होण्याची संधी सर्वांसाठी उपलब्ध आहे. विभागातील सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी त्यांचे कुटूंबिय, मित्र परिवार, नातेवाईक, महाविद्यालय व विद्यापीठातील विद्यार्थी यांनी हरित सेनेमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी श्री. खारगे यांनी केले. त्यासाठी http://www.greenarmy.mahaforest.gov.in या तसेच http://www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येईल.कोकण विभागाला दिलेले वृक्षलागवडीचे लक्ष कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी व त्यांच्या विभाग प्रमुखांनी लोकसहभागातून पूर्ण करतील अशी मला अपेक्षा आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात घ्यावा. वृक्षलागवड कार्यक्रमाविषयी विश्वासार्हता वाढविण्यासाठी झाडे जगविण्याचे प्रमाण वाढविणे. यासाठी जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवड क्षेत्राला वारंवार भेटी देऊन पाहणी करावी, असे त्यांनी सांगितले.यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी कोकण विभागाला दिलेले 1 कोटी 33 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण केले जाईल याची यावेळी ग्वाही दिली. यावेळी कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या जिल्हयातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांनी सादरीकरणाद्वारे यावर्षीच्या वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती दिली.