रत्नागिरी : नाणार रिफायनरीच्या विरोधात संघर्ष समिती स्थापन करून ताकद निर्माण केलेल्या समितीने थेट निवडणूक आखाड्यात उडी घेतली असून कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे नाव बदलून आता कोकण शक्ती महासंघ असं नवं नाव संघटनेचं ठेवण्यात आलं आहे. ही संघटना राजापूर मतदार संघासह विधानसभेच्या तीन जागा लढविणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी स्पष्ट केलं आहे.
रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलन कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून कोकणातल्या घराघरात पोहचलं. त्यामुळे समितीने आता कोकणच्या पुढील वाटचालीसाठी सक्षम पर्याय म्हणून आमच्या संघटनेने समितीची नाव बदलून कोकण शक्ती महासंघ असं ठेवलं असून, चारही प्रमुख पक्षाच्या प्रमुखांना आम्ही भेटणार असल्याचं वालम यांनी म्हटलं आहे. विधानसभेच्या 3 जागा लढवणार असून, राजापूर आणि मुंबईच्या दोन विधानसभेच्या जागा लढविणार असल्याचं वालम यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच जो पक्ष आम्हाला विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठींबा देईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. राजापूरमध्ये सध्या आमच्या संघटनेकडे 35 हजारांचं मतदान आहे. त्यामुळे आम्ही विधानसभेला शिवसेनेकडेही पाठींबा मागणार असून, राजापूरमध्ये शिवसेना, आणि स्वाभिमान संघटनेने विधानसभेला उमेदवार न देता आम्हाला पाठिंबा द्यावा अशी मागणी करणार असल्याचंही वालम यावेळी म्हणाले..