
रत्नागिरी, 22 मे : कोकण रेल्वे मार्गावर आजपासून (शुक्रवार) 15 स्टेशन्सवर पीआरएस काऊंटर्स सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे ज्या 200 स्पेशल ट्रेन्स धावणार आहेत, त्या ट्रेनचे रिझर्व्हेशन या काऊंटर्सवर मिळणार आहे.
गेले दोन महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रेल्वे सेवाही ठप्प होती. फक्त मालगाडी आणि मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. लॉकडाऊनमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद होती. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील विविध शहरातील पीआरएस काऊंटर्स बंद होते. आजपासून विविध शहरातील पीआरएस काऊंटर्स सुरू झाले आहेत. यामध्ये माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, उडप्पी, कुमटा, बेंदूर, येथील कोकण रेल्वेचे काऊंटर्स सुरू झाले आहेत. तिकिटासाठी प्रवाशांचीही रेल्वे स्थानकावर तुरळक गर्दी होती.