रत्नागिरी, (आरकेजी) : कोकण रेल्वेवरील स्थानकांवर तसेच कोकण रेल्वेमध्ये अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या तब्बल ५१ फेरीवाल्यांवर कोकण रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे. फेरीवाल्यांकडून २१ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
काही दिवसांमध्ये कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण, खेड तसेच कोलाडमधील अनधिकृत फेरीवाल्यांसंदर्भात रेल्वेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.
विशेष पथकाने तसेच बेलापूर मुख्यालयातील टीमने ३ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट दरम्यान फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी रत्नागिरी ते कोलाड दरम्यान मोहिम राबविली.
फेरीवाल्यांकडून न्यायालयाच्या आदेशानुसार २१ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या या विशेष मोहिमेमुळे अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. कारवाईमुळे काहीप्रमाणात तरी अनधिकृत फेरीवाल्याना वचक बसला आहे. दरम्यान अशा कारवाया यापुढेही सुरूच ठेवल्या जातील असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले.