रत्नागिरी : कोकण रेल्वेचे १० जून पासून पावसाळी वेळापत्रक सुरू होत असून, ३१ ऑक्टोबरपर्यंत गाड्यांची गती धिमी ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले असून, खबरदारीचा उपाय म्हणून धोकाच्या ठिकाणी अलार्म सिस्टिम लावण्यात आली आहे. तसेच रेल्वेमार्गानजिकच्या कटिंग केलेल्या डोंगरांची ‘बूमलिफ्ट’मधून पाहणी करण्यात आली असून, आवश्यक तेथे दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांनी दिली.कोकण रेल्वेचा मार्ग डोंगरदर्यातून जात असल्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर विशेष लक्ष्य ठेवले जाते. पावसाळी वेळापत्रकात मुंबई ते वीर या मार्गावर रेल्वेची नेहमीची गती (फुल स्पीड), वीर ते कणकवली ७५ किमी आणि कणकवली ते मडुरा ९० किमी प्रतितास या वेगाने रेल्वे धावणार आहेत. या मार्गावर ३५० ठिकाणी डोंगर कापून रेल्वेलाईन टाकण्यात आली आहे. यातील ३२० ठिकाणच्या ड्रेनेज स्वच्छतेचे काम प्रगतीपथावर असून, येथे पाणी तुंबणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. उर्वरित ठिकाणच्या कामांनाही लवकरच प्रारंभ होणार आहे. वादळी वार्यामुळे रेल्वेमार्गावर झाडे कोसळू नयेत म्हणून या मार्गावरील धोकादायक झाडांची छटाई करण्यात आली आहे. यामध्ये आकेशिया झाडांचा प्रामुख्याने समावेश आहे. या मार्गावर दरड कोसळल्यास ती तप्तरतेने हटवण्यासाठी ३ पोकलॅन मशीन सज्ज ठेवण्यात आली आहेत. यापैकी एक रत्नागिरी, एक चिपळूण आणि एक कणकवलीत आहेत. फ्लॅट वॅगनवर ही मशीन ठेवण्यात आली असून, दरड कोसळल्यास तातडीने ती घटनास्थळी रवाना होऊ शकतील. याशिवाय रोहा त मदुरा या मार्गावर रात्रीच्यावेळी गस्त घालण्यासाठी ८५ पेट्रोलमनची नेमणूक करण्यात आली असून, ६५ ट्रॅकमन दिवसभर कार्यरत राहणार आहेत. या मार्गावरील आगवे आणि बोरडवे या ठिकाणी उंच डोंगर असून, येथे दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अलार्म सिस्टिम लावण्यात आली आहे. या मार्गाची पाहणी ‘बूमलिफ्ट’ या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे करण्यात आली असून, या यंत्रणेमार्फत २० मीटर उंचीपर्यंतच्या डोंगरांची पाहणी करण्यात आली आहे. आवश्यक तेथे दुरुस्तीचे उपाय करण्यात आले असून, पावसाळ्यात रेल्वेसेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कसोशिने प्रयत्न करण्यात येत आहेत.कोकण रेल्वेमार्गावरील काळ, सावित्री आणि वाशिष्ठी नदीवर फ्लड वॉर्निंग सिस्टिम (पूर सतर्क यंत्रणा) बसवण्यात आली असून, या सिस्टिमद्वारे स्टेशन मास्तर, इंजिनिअर आणि कंट्रोल रुमला धोक्याचा इशारा देण्यात येतो. तसेच या नदीत पाण्याखाली असणार्या पुलाच्या भागाची स्कूबा डायव्हर्सकडून पाहणी करण्यात आली असून, त्याचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे.