रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस यांनी कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्थांच्या मागण्यांसाठी दंड थोपटल्यानंतर कोकण रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आणि बरेच दिवस रेंगाळलेला ऑनलाईन परीक्षेचा निकाल १ सप्टेंबर पूर्वीच जाहीर झाला. त्यामुळे प्रकल्पग्रस्थांचे प्रश्न को.रे. प्रशासनाकडून सकारात्मक पद्धतीने सोडविण्यास सुरुवात झाली असून १ रोजी होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे.
रत्नागिरी येथे तीन जिल्ह्यांच्या झालेल्या बैठकीत निलेश राणे यांना प्रकल्पग्रस्थानी कृती समिती मार्फत निवेदन सादर केले. यात ऑन लाईन परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची प्रामुख्याने मागणी होती. यावेळी ऑनलाइन परीक्षेच्या निकलाची, कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची मागणी येत्या १५ दिवसांत मान्य करा. अन्यथा १ सप्टेंबरला कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयाला टाळ ठोकणार, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी दिला होता. दरम्यान या इशाऱ्याची दखल घेत कोकण रेल्वेने इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन पदासाठी घेण्यात परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. अन्य एका परीक्षेचा निकाल देखील येत्या काही दिवसात लावला जाणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून निलेश राणे यांना सांगण्यात आले. को.रे. प्रशासनाकडून निकाल जाहीर झाल्यामुळे 1 सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे निलेश राणे यांनी सांगितले आहे.