रत्नागिरी :कोकण रेल्वे स्थानकासमोरील गाड्या अस्ताव्यस्तपणे पार्किंग करून अन्य वाहनांसमोर अडचणी निर्माण करणार्यांना आता चांगलाच चाप बसणार असून, वाहन पार्किंगच्या जागा बदलण्यात आल्या आहेत. जुन्या जागी वाहने उभी केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.रत्नागिरी स्थानकासमोर रिक्षा स्टॅण्डसह दुचाकी, चारचाकी वाहनांचे पार्किंग ठेवण्यात आले आहे. काही वाहनचालक ठराविक जागेऐवजी कुठेही वाहने पार्क करत असल्यामुळे अनेकवेळा एसटीला अडथळा होतो. प्रवाशांना ये-जा करता येत नाही. त्यासाठी वाहनतळाची जागा बदलण्याचा निर्णय रेल्वे व्यवस्थापनाने घेतला आहे. स्थानकासमोर फक्त रिक्षा स्टॅण्ड ठेवण्यात येणार असून, उर्वरित गाड्या जवळच्या मोकळ्या जागेत उभ्या करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. ही मोहिम दोन दिवसांपूर्वी सुरु झाली आहे. स्थानिक पोलिस आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने हा उपक्रम राबविला जात आहे. बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नो पार्किंग परिसरात उभे असलेले दुचाकी आणि चारचाकी वाहने उचलण्यास सुरवात केली आहे. स्थानक इमारतीच्या समोरील परिसर मोकळा ठेवणे हा या मागचा उद्देश आहे. यामुळे एसटी बसेस तिथे व्यवस्थीत ये-जा करतील. सर्वसामान्यांना त्याचा कमी त्रास होणार आहे. दुचाकी स्थानकाजवळील एका खासगी हॉटेलच्या समोरील मोकळ्या जागेत उभ्या करता येतील तर चारचाकी गाड्या स्थानकासमोरील स्तंभाच्या मागील बाजूस उभ्या करता येणार असल्याचे कोरे प्रशासनाने सांगितले.