रत्नागिरी (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील साहित्यिकांना विविध वाङ्मयीन पुरस्कार दिले जातात. प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, द्वितीय क्रमांकाचे विशेष पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे आहे. कोमसापचे पुरस्कार समितीचे निमंत्रक अरुण नेरुरकर यांनी या पुरस्कारांची आज घोषणा केली. पुरस्कार वितरण कार्यक्रम कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे 28 जानेवारीला सकाळी 10 वाजता कोमसापच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात होणार आहे.
वाङ्मय प्रकार, पुरस्कार, लेखक आणि पुस्तकाचे नाव या क्रमाने कादंबरी- र. वा. दिघे पुरस्कार- विवेक गोविलकर (युनायटेड आयर्न अँड स्टील), वि. वा. हडप स्मृती विशेष पुरस्कार- गुंजार पाटील (शिवशंभू), कथासंग्रह- वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार- राजश्री बर्वे (चांदण्यांचं झाड), विद्याधर भागवत स्मृती विशेष पुरस्कार- कल्पना बांदेकर (मन पाखरू पाखरू), कविता- आरती प्रभू स्मृती पुरस्कार- वसुंधरा तारकर (बाईमाणसाच्या संज्ञेतून), वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार- नरसिंग इंगळे (शब्दवेणा), चरित्र, आत्मचरित्र- धनंजय कीर स्मृती पुरस्कार- जगन्नाथ वर्तक (हिरवे वाळवंट), श्रीकांत शेट्ये स्मृती विशेष पुरस्कार- भावना पाटोळे (यशवंतराव चव्हाण), समीक्षा- प्रभाकर पाध्ये स्मृती विशेष पुरस्कार- (कै.) डॉ. विद्याधर करंदीकर (कवी, नाटककार स्वा. सावरकर), ललित- अनंत काणेकर स्मृती पुरस्कार- वैभव साटम (बिटकी), सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे पुरस्कार- प्रतिभा सराफ (माझी कुणीतरी), बालवाङ्मय- प्र. श्री. नेरूरकर स्मृती पुरस्कार- मानसी हजेरी (ससोबाचा चांदोबा), संकीर्ण- वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार- डॉ. अविनाश पाटील (आगरी बोली, लोकसंस्कृती आणि साहित्य परंपरा), अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार विनोद पितळे (बायलाइन), वैचारिक साहित्य- फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार- डॉ. सोमनाथ कदम (मातंग समाजाचा इतिहास), नाटक, एकांकिका- रमेश कीर पुरस्कार- अमोल रेडीज (द गेम ऑफ डेस्टिनी). दृकश्राव्य, कला-सिनेमा या विषयावरील योग्य पुस्तक आले नसल्याने पुरस्कार देण्यात येणार नाही.