रत्नागिरी, 2 june : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आता कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा धोका आहे. हवामान विभागाकडून देखील त्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान ज्या बोटी समुद्रात गेलेल्या होत्या मासेमारी करता यांना माघारी बोलावण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासन देखील यासाठी सतर्क झाले असून एनडीआरएफचे 26 जणांचं पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे . वादळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे . 3 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर वादळाचे पडसाद दिसून येतील तसेच ताशी 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार झालेले वादळ महाराष्ट्र , गुजरात किनारपट्टीवर 3 जूनला धडकेल अशी शक्यता आहे.
मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये आणि किनारपट्टी वरील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफच्या 26 जवानांचे पथक चिपळण येथे ठेवण्यात आले आहे. या पथकाचे अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चाही केली. वादळाला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं, तसेच पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती.