मुंबई : कोकण विभागातील भौगोलिक परिस्थिती ही महाराष्ट्रातील इतर विभागांच्या दृष्टीने वेगळी आहे. त्यामुळे कोकणाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या विभागासाठी जलसंधारणाच्या उपचारांचे मापदंड तयार करावेत, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्रासाठी जलसंधारण कामांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार कोकणात झालेल्या कार्यवाहीचा तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा आढावा आज प्रा. शिंदे यांनी घेतला. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण,सुभाष पाटील, कदम, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, मृदा व जलसंधारण विभाग औरंगाबाद आयुक्त एच. के. गोसावी, लघुसिंचन (जलसंधारण) विभागाचे मुख्य अभियंता सु. पा.खुशिरे आदि उपस्थित होते.
मृद व जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे म्हणाले, कोकणातील जमिनीची पत वेगळी आहे. येथील जमिनीत पाणी मुरत नसल्याने या विभागासाठी जलसंधारणाच्या उपचाराचे वेगळे मापदंड तयार करावे लागणार आहेत. त्यातून जलयुक्त शिवारची कामे योग्यरितीने होऊन पाण्याची क्षमता वाढेल