मुंबई : कोकणात घर बांधणीसाठी परवाने देण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात यावे यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला असून यासंदर्भात लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे.
कोकणातील ग्रामीण भागात इमारत बांधकामासाठी परवाने ग्रामपंचायतीमार्फत देण्यासंदर्भात केसरकर यांच्या मागणीवरून ग्रामविकास मंत्री मुंडे यांच्याकडे बैठक झाली. यावेळी केसरकर यांच्यासह ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, राजन साळवी आदींसह अधिकारी उपस्थित होते.
घर बांधणीसाठी अकृषीक परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी मिळविण्यसाठी स्थानिकांना विविध कार्यालयात जावे लागते. स्थानिकांचा त्रास वाचावा व ग्रामीण भागातील अकृषक परवाने ग्रामपंचायत मार्फत देण्यात यावे, यासाठी केसरकर यांनी ग्राम विकास मंत्री मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला. या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या बैठकीत सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे व ग्रामपंचायतींना अधिकार देण्यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित असल्याची माहिती राज्यमंत्री केसरकर यांनी दिली.
सिंधुदुर्गमधील रास्तभाव दुकानदारांच्या मागण्यासंदर्भात मंगळवारी बैठक : केसरकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारकांच्या मागण्यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारकांच्या मागण्यासंदर्भात केसरकर यांनी नुकतीच सावंतवाडी येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी रास्तभाव धान्य दुकानदारांना शासनाच्या द्वारपोच योजनेप्रमाणे वाहतूक भाडे देणे तसेच दुकानादारांच्या कमिशनमध्ये वाढ करणे या मागण्यांवर यावेळी चर्चा झाली. या मागण्यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री बापट यांच्या सोबत मंगळवारी बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले.