
रत्नागिरी : कोणी ऐरागैरा माझा राजकीय अस्त करू शकत नाही असं टोला लगावत म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेची सर्व टीम आणि सामंत कंपनी निवडणुकीत निलेश राणेला बाद करायला निघाली आहे. पण निलेश राणेला बाद करणं एवढं सोपं नसून येत्या 2019 च्या विधानसभा निवडणूकित उदय सामंतचाच अस्त करू अशी टीका निलेश राणे यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत आज पत्रकार परिषदेत म्हणाले की त्यांचं हे वक्तव्य म्हणजे बालिश वक्तव्य आहे. मला तीन वेळा या मतदार संघातील लोकांनी फार मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आहे.आणि माझा जर राजकीय अस्त करायचा असेल तर ते मतदार करू शकतात कोणी ऐरागैरा माझा राजकीय अस्त करू शकत नाही, हे माझं प्रामाणिक मत असल्याचं सामंत यावेळी म्हणाले.
दरम्यान पोलिसांबरोबर आपलं संगनमत असल्याचा आरोप म्हणजे राज्यातील सर्वच पोलिसांचा तो अपमान आहे. राजकारण व्यक्तिगत पातळीवर करा पण पोलिसांना बदनाम करू नये असाही टोला सामंत यांनी निलेश राणे यांना यावेळी लगावला.
दरम्यान रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांचा अडीच ते तीन लाख मताधिक्याच्या फरकाने विजय होईल. तसेच सिंधुदुर्गतून त्यांना एक लाखाचं मताधिक्य जास्त मिळेल असा विश्वासही सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.















