मुंबई : नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना (NAINA) अंतर्गत येणाऱ्या २७० गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच कोंढाणे प्रकल्प हा पाणी पुरवठा प्रकल्प म्हणून घोषित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
नवी मुंबई प्रभावित अधिसूचित क्षेत्राचा विकास करण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती करण्यात आली आहे. हा प्रकल्प ६४४वर्ग कि.मी. क्षेत्रावर राबवण्यात येणार असून या प्रकल्पात 270 गावांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी लागणारी सध्याची तसेच भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडून कोंढाणे प्रकल्प ‘आहे त्या स्थितीत’ सिडकोकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रकल्पासाठी आजपर्यंत झालेल्या बांधकामाचे मूल्यांकन करुन हा खर्च सिडकोने कोकण पाटबंधारे महामंडळास द्यावयाचा आहे. तसेच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या आवश्यक मान्यता घेऊन धरणाचे संकल्पन सिडकोने मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (नाशिक) यांच्याकडून करुन घ्यायचे आहे. या प्रकल्पासाठी अंमलबजावणी संस्था नेमण्याचे अधिकार सिडकोला असतील. कोंढाणे प्रकल्पातील एकूण१०५.९७ दलघमी पाणीसाठ्यापैकी १० .५५ दलघमी पाणी शेतीसाठी वापरण्यास प्रचलित सिंचन दरानुसार होणारी पाणीपट्टीची रक्कम सिडकोला देण्याच्या अटीवर देण्याचे या निर्णयादरम्यान मान्य करण्यात आले. तसेच या प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात यापूर्वी एसीबीमार्फत सुरु असलेली चौकशी कोणत्याही प्रकारे बाधित होणार नाही.