मागील अनेक वर्षे साहित्य क्षेत्रात करत असलेल्या कार्याची दखल
मालगुंड : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रदान केले जातात. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा – मालगुंडच्या वतीने मागील अनेक वर्षे सातत्याने मराठी भाषा आणि मराठी साहित्य चळवळ वृंद्धीगत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची दखल यावर्षी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कार मालगुंड शाखेला प्राप्त झाला आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक शाखा कार्यरत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड शाखा कार्यरत आहे. तेंव्हापासून आजपर्यंत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या उद्देशानुसार मालगुंड शाखा प्रत्येक वर्षी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबवत असते. मागील काही वर्षात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन, कोमसापचा वर्धापन दिन, महाराष्ट्र दिन, श्रावणधारा, विविध विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद, कवी संमेलन, कार्यशाळा, मनांमनातील श्रावणधारा, कवी केशवसुत यांची जयंती, वाचन प्रेरणा दिन, कवी केशवसुत यांची पुण्यतिथी हे व असे अनेक उपक्रम राबविण्यात मालगुंड शाखा अग्रेसर असते. मराठी भाषा आणि साहित्य चळवळ कायमस्वरूपी प्रवाही राहण्यासाठी शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर आणि कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा कोमसाप जिल्हा मंडळ प्रतिनिधी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचे सभासद कार्यरत आहेत. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या सहाय्याने साहित्यसेवा या शाखेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न शाखा करत आहे. या सर्व बाबींची दखल घेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुरस्कार निवड समितीने कोकण मराठी साहित्य परिषद शाखा – मालगुंड या शाखेला वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सदर पुरस्कार नुकताच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळ्यात कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, पुरस्कार निवड समितीचे प्रमुख प्रा. अशोक ठाकूर यांच्यासह कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा पुरस्कार वरील मान्यवरांच्या हस्ते कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, शाखेचे सचिव विलास राणे, युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष अरुण मोर्ये, सहसचिव रामानंद लिमये, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती खजिनदार रवींद्र मेहेंदळे, सदस्य शेखर खेऊर, सलोनी शीतप, संगीता मोर्ये, सुप्रिया अंकलगे यांनी शाखेच्या वतीने स्वीकारला.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडला वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहेत.