नवी दिल्ली : देशांतर्गत कोळसा उत्पादनात वाढ झाल्याने २०१४-१५ च्या तुलनेत २०१५-१६ मध्ये कोळसा आयातीत घट झाली आहे. चालू वर्षात २०१६-१७ मध्ये आयात कमी होत आहे. २०१४-१५ मध्ये २०१७.७८ मे.ट. कोळसा आयात करण्यात आला होता. मात्र २०१५-१६ मध्ये ९९.८८ मे.ट कोळसा बाहेरुन आणण्यात आला. एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ या काळात कोळसा आयातीमध्ये गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत २.५९ टक्के घट नोंदवली आहे. अशी माहिती ऊर्जा आणि कोळसा खात्याचे मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
देशांतर्गत कोळसा उत्पादन चांगले झाल्यामुळे आयातीमध्ये घट झाली. हे एकमेव कारण यामागे नाही, तर ऊर्जा क्षेत्राच्या कोळसा पुरवठ्याच्या धोरणात बदल करण्यात आला आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे, असेही गोयल यांनी यावेळी सांगितले.
इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (आयईए)च्या २०१४ च्या अहवालानुसार भारत जगातला तिसरा सर्वात मोठा कोळसा निर्मिती करणारा देश आहे, तर कोळसा आयातीमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो, असेही कोळसा मंत्री गोयल यांनी यावेळी सांगितले.