मुंबई : कोळी भगिनींनी श्री सकलाई / गुंडी देवी उत्सवाच्या निमित्ताने कोळी झेंडा राजभवन परिसरात फडकवला व कोळी परंपरा जपत आई सकलाई माऊलीचे दर्शन घेतले. स्वयंभू देवीच्या दर्शनासाठी वर्षातून एकदाच प्रवेश खुला असतो.
पारंपरिक टिमकी (खालू) बाजाच्या ठेक्यावर नृत्य करत वाजत गाजत कोळी माहिलांनी आई माऊलीला आषाढ जत्रे निमित्त कोळी भूमिपुत्र समाज रक्षणासाठी साकडे घातले व “सदानंदाचा येळकोट, आई माऊलीचा उदो”, “कोळी समाज एकजुटीचा विजय असो!” ह्या जयघोषाने संपूर्ण राजभवन परिसर दणाणला होता. जणू आई सकलाई माता गेली कित्येक वर्ष तिच्या दर्या वर्दी कोळी लेकरांची वाट पाहत बसली होती व आज तो योग आला, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
नंतर कोळी बंधू भगिनी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, कोळी समाजाच्या समस्या मांडल्या. त्यांना श्री गुंडी देवी उत्सवा निमित्त शुभेच्छा दिल्या. पारंपारिक वेशभूशेत कोळी महिला पाहून राज्यपाल देखील आनंदित झाले.
मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्था ह्याच्या अध्यक्षा राजेश्री भानजी तसेच तमाम कोळी महिला ह्यांच्या प्रयत्नातून हा आजचा पारंपारिक सोहळा पार पाडला. 250 कोळी बांधव एकत्र येऊन आई गुंडी सकलाई देवीच्या आषाढ उत्सवात सहभागी झाले, अशी माहिती मोहित रामले मुंबई अध्यक्ष अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघ यांनी दिली.