डोंबिवली (प्रशांत जोशी): कोळी बांधवाच्या गेल्या अनेक वर्षंपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मोदी सरकार नक्कीच पूर्ण करेल, सरकार शब्द पाळतो मात्र त्यासाठी धीर धर, असा मौखिक सल्ला देत कोळी बांधवांनी आपल्या मुलांना शिक्षित, सक्षम बनवा व त्यांच्यात जागरूक नागरिकाची प्रतिमा निर्माण करा, असे आवाहन केंद्रीय खाद्य व उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी कोळी महासंघाच्या राज्य पदाधिकारी मेळाव्यात केले.
कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेली कोळी महासंघाचा राज्य मेळाव्या प्रसंगी कार्यध्यक्ष प्रकाश बोबडी, जेष्ठ उपनेते रामकृष्ण केणे, देवानंद भोईर, युवा अध्यक्ष चेतन पाटील, महिला प्रदेश अध्यक्षा सुमनताई कोळी, राजहंस टपके, शरद कोळी, साईनाथ अभंगराव, सतीश धडे, शिवशंकर फुले, किरण कोळी, नरेंद्र पाटील आदींसह मराठवाडा, कोकण, खान्देश , विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र या प्रांत विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष, विभाग अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
महाराष्ट्रातील कोळी समाज बांधवांच्या समस्या व त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुंबई दौऱ्यासाठी आलेल्या केंद्रीय खाद्य व उद्योग राज्य मंत्री दोन दिवसासाठी मुंबईत आल्या होत्या. कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी पुढाकार घेत कोळी महासंघाच्या मुख्यालयात राज्य पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता. यावेळी निरंजन ज्योती यांनी कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्रातील समस्या सोडविण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांशी बोलून महासंघाची बैठक घेऊन त्यावर ठोस निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
कोळी बांधवाना जातीचे दाखले सुलभतेने मिळावे व आमच्या समाजाला भाजपा सरकारमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला ज्याप्रकारे जीएसटी करामधून वगळले आहे. त्याचधर्तीवर मत्स्यमालाला करातून वगळण्यात येईल, असे आश्वासन भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणुकीदरम्यान दिले होते. मात्र साडेतीन वर्ष उलटून गेल्यानंतर ही आमच्या आजवरच्या कोणत्याच समस्या सुटलेल्या नाहीत, अशी खंत व्यक्त करत समस्या सोडविण्याची विनंती वरिष्ठांना करावी अशी मागणी, महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी व्यक्त केली. याप्रसंगी चिटणीस राजहंस टपके, युवा अध्यक्ष चेतन पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
दरम्यान, कोळी समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अध्यक्ष रमेशदादा पाटील यांना भाजपा सरकारने संधी द्यावी, असे निवेदन यावेळी ज्योती यांच्याकडे देण्यात आले.














