कोल्हापूर, (नवनाथ मोरे) : पुरग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ ट्रेंड युनियन, जनवादी महिला संघटना, शेतमजूर युनियन, स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्च्याला दसरा चौकातून सुरूवात झाली. हातात मागण्याचे फलक आणि संघटनांचे झेंडे घेऊन हजारोंच्या संख्येने पुरग्रस्त सहभागी झाले होते. मोर्च्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर तेथे ठिय्या मांडत मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापूराचा मोठा फटका शेतकरी, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी यांना बसला आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. शेतीचे ही अतोनात नुकसान झालेले असताना सरकारच्या भरीव मदतीची गरज आहे. परंतु सरकार आखडता हात घेत आहे. यामुळे पुरग्रस्तांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि व्यवसायिकांना व्यवसायासाठी घेतलेले कर्ज फेडणे मुश्कील होत आहे. यात बँकांनी पुन्हा परतफेडीसाठी तगदा आलेला आहे. नव्याने मुलांच्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे, सरकारने पुरग्रस्त विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारची शैक्षणिक शुल्क माफ करावे, सगळ्या परिस्थितीचा विचार करून १०० टक्के मदत जाहीर करावी. तसेच केंद्र सरकारने याला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, अशा विविध मागण्या संघटनांच्या वतीने करण्यात आल्या. केंद्राला सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याबाबत केंद्र सरकार कपटीपणाने वागत आहे. सरकारने योग्य निर्णय घेतले नाही तर लढा तीव्र करण्याचा इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी डॉ. उदय नारकर, प्राचार्य ए.बी. पाटील, कॉ. सुभाष निकम, प्रा.डॉ. सुभाष जाधव, विजयाराणी पाटील, मुमताज हैदर, भाऊसाहेब कसबे, अमोल नाईक, तुषार सोनुले, अभिषेक शिंदे, पंकज खोत, विकास पाटील, आण्णासाहेब रेड्डे, अश्विनी पाटील आदीसह हजारोंं पुरग्रस्त सहभागी झाले होते.