कोल्हापूर, (नवनाथ मोरे) : लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांंसाठी सहाय्यक कामगार आयुक्तालयावर काल सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला. अंगात सुरक्षा जँकेट आणि डोक्याला पिवळे सुरक्षा हेल्मेट घातलेल्या हाजारोंं कामगारांनी दसरा चौकातून मोर्चाला सुरूवात केली. सहाय्यक आयुक्त कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर आयुक्त पुण्याला गेले असल्याचे समजले. आयुक्तांनी पळ काढल्याचा आरोप करत कामगारांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बांधकाम कामगारांना दिवाळीला २० हजार बोनस मिळावा, बंद केलेली मेडिक्लेम योजना तात्काळ सुरू करण्यात यावी, घरबांधणीसाठी साडेपाच लाख रूपये द्या आणि जाचक अटी रद्द करा अशा २५ मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता. कामगार कल्याणकारी मंडळाकडे १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पडून आहे. त्याला जितके व्याज मिळते इतका सुध्दा खर्च भाजप-सेना सरकारने केलेला नाही. उलट चालू योजना बंद करण्याचा घाट हे सरकार घालत आहे, असा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला.
महापूरामुळे जिल्ह्यातील कामगारांचे अतोनात नुकसान दालेले आहे. १८-५० वयोगटातील कामगारांना नैसर्गिक मृत्यू लाभ मिळत नाही. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबांंना उपचाराविना मरण्याची वेळ आली आहे. तसेच नवीन कामगार नोंदणी बंद केल्याने कामगारांवर दिवसेंदिवस अन्याय वाढ आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. यावर सरकारने योग्य पाऊल उचलले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे कॉ. भरमा कांबळे, सीटू चे कार्याध्यक्ष कॉ. चंद्रकांत यादव, जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम, शिवाजी मोरे, आनंदा कराडे, दगडू कांबळे, दत्ता गायकवाड आदीसह हजारोच्या संख्येने कामगार उपस्थित होते.