रत्नागिरी, (आरकेजी) : प्रयोगशील शेतकरी यज्ञेश भिडे याने लवंगी मिरचीचे पीक कोकणातील लाल मातीत घेऊन यशाचा मार्ग इतर शेतकर्यांनासमोर आखून दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मिरची हे पीक कोकणातील लाल मातीत घेण्याचे धाडस यज्ञेशने केले. त्याच्या या धाडसाचे आणि प्रयोगशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील काळ्या मातीत येणारे मिरचीचे पिक कोकणातही घेता येऊ शकते हे यज्ञेशने दाखवून दिले आहे. यंज्ञेशच्या शेतातील रोपांत आता मिरच्या दिसू लागल्या आहेत. रत्नागिरी जवळच्या मालगुंड गावातला यज्ञेश कोकण कृषी विद्यापीठातून बागायतीची पदवी घेवून बाहेर पडला. पारंपरिक आंब्याचा व्यवसाय न करता त्याने वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. पश्चिम महाराष्ट्रातील ठसकेबाज मिरचीची यशस्वी लागवड कोकणात करण्याचा धाडसी निर्णय़ त्याने घेतला. त्यासाठी तेथे जावून मिरची लागवडीचा अभ्यास केला.
भरघोस उत्पादन
व्हिएनआरएस १० या जातीची निवड त्याने कोकणात मिरची लागवडीसाठी केली. जानेवारी २०१७ मध्ये मिरचीची रोपे लावली. दिड एकरवर त्याने मिरची लागवड केली. ठिंबक पध्दत वापरली. सेंद्रीय आणि रासायनिक पद्धतीने यंज्ञेश यांनी पश्चिम महाराष्ट्राला टक्कर देईल असे मिरचीचे उप्पादन घेतलय. पहिल्या तोडीतून ८०० किलो, दुसरी तोड १४००किलो, तिसरी तोड चार टन आणि पुर्ण पावसाळ्यापर्यत यंज्ञेश कोकणातल्या लाल मातीतून चक्क ४० टनांपर्यंत मिरचीचे उत्पादन घेणार आहे. खर्च वजा जाता केवळ १० ते १२ लाखाचा नफा अपेक्षीत आहे. ४० ते ५० रुपये किलो भावाने रत्नागिरीच्या मार्केटला मिरची विकली जात आहे.
महिलांना मिळाला रोजगार
यज्ञेश याच्या या शेतीमुळे गावातल्या बेरोजगार महिलांना रोजगार मिळाला आहे. दररोज १५ महिला रोजंदारीवर मिरचीच्या शेतात काम करतात. चांगला रोजगार यातून मिळत असल्याने आपल्या कुटुंबाला या शेतीमुळे हातभार लागत आहे, असे कविता निमरे या रोजगार मिळालेल्या महिलेने सांगितले.
कोकणातील शेतकर्यांनी शेतीत निरनिराळे प्रयोग करणे महत्वाचे
पश्चिम महाराष्ट्र मिरचीच्या उप्पादनात अग्रेसर आहे. त्यामुळे मिरचीच्या झणझणीत पणाचा ठसका कोल्हापूरी अशी मिरचीची ओळख यज्ञेश सारख्या कोकणातल्या तरुणामुळे बदलू शकली आहे. प्रयोगशीलतेमुळेच हे शक्य झाले. त्यामुळे कोकणातली शेतकर्यांनी शेतीत निरनिराळे प्रयोग केल्यास अधिक उत्पन्न आणि उत्पादन सहन मिळवता येईल.