मुंबई : कोकणात येणाऱ्या प्रकल्पांचा जास्तीत जास्त फायदा स्थानिक लोकांना मिळाला पाहिजे. नवे प्रकल्प येणार असे कळताच मोठे व्यावसायिक कोकणातील शेतक-यांच्या जमिनी विकत घेऊ लागतात, पर्यायाने स्थानिक लोकांना नव्या प्रकल्पात फायदा मिळत नाही. तेव्हा शेतक-यांनी त्यांच्या जमिनी विकू नयेत, असे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. कोकणातील रत्नागिरी परिसरात देशातील सर्वात मोठी तेल रिफायनरी प्रकल्प स्थापन करण्या संदर्भातील शक्यता पडताळून पाहण्यासाठी आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या या रिफायनरीसाठी राज्य शासनाने जागा उपलब्ध करुन दिल्यास देशातील हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पाची निर्मिती क्षमता सहा कोटी मेट्रिक टन एवधी असणार आहे. हा प्रकल्प उभा राहिल्यास एक लाख लोकांसाठी रोजगार निर्मीती होणार आहे. हा प्रकल्प उभा रहावा यासाठी शासना तर्फे पुर्ण सहकार्य करण्यात येईल, मात्र स्थानिक युवकांनीही सकारात्मक पाठींबा द्यावा असेही चव्हाण यांनी सांगितले.
या वेळी विधान परिषद सदस्य विजय (भाई) गिरकर, माजी विधान सभा सदस्य प्रमोद जठार, बाळ माने, विनय नातू,राजन तेली यांच्या सह अनेक मान्यवर नेते आणि तेल कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.