
महामाई नगर, बुरोंडी, ता. दापोली, जिल्हा : रत्नागिरी येथील गोवले कुटुंबाच्या घरी विराजमान झालेला बाप्पा.
रत्नागिरी, प्रतिनिधी : बाप्पाच्या आगमनाची प्रतिक्षा अखेर आज संंपली असून कोकणात आजचं वातावरण बाप्पामय झालं आहे. कोकणात सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. कोरोनाचे निर्बंध यावर्षी नसल्याने गणेशोत्सवाच्या उत्साहाला उधाण आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही आज बाप्पांचं वाजत गाजत आगमन झालं आहे.
कोकणात गौरी-गणपतीचा सण अगदी घराघरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणतला गणेशोत्सव परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. प्रत्येक कोकणी कुटुंबात या सणाबद्दल एकप्रकारचा व्यक्तिगत मनोभाव तयार झालेला आहे. त्यातही कोकणातील या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असे की घराघरातून पुजल्या जाणाऱ्या गौरी-गणपतींचा थाट मात्र सार्वजनिक उत्सवांसारखाच असतो. दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात कोकणात गणेशोत्सव साजरा होत असल्याने लाखोंच्या संख्येने चाकरमानी जिल्ह्यासह कोकणात दाखल झाले आहेत.
आज गावागावात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकी काढत गणरायाला आपल्या घरी आणण्यात आलं.
रत्नागिरी जिल्हयामध्ये १ लाख ६७ हजार ८४४ घरगुती गणपती तर १०९ सार्वजनिक गणेशोत्सावाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामधील ११ हजार ९८४ दीड दीवसांचे गणपती आहेत. गौरी गणपतीपर्यंत १ लाख ३४ हजार१०३ घरगुती गणपती तर अनंत चतुर्दशीपर्यंत २१ हजार ७५७ घरगुती व १०९ सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होणार आहेत.