रत्नागिरी (कोकणवृत्तविशेष) : पारंपरिक वाद्य, ढोलावर थाप, ग्रामदेवतेच्या मंदिरातील पालख्या, होळीभोवती होम अशा धार्मिक वातावरणाने कोकणातील शिमगोत्सवात रंग चढू लागला आहे. कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा असणारा हा उत्सव धुमधडाक्यात सुरू झाला आहे. नोकरी धंद्यानिमित्ताने गावाबाहेर गेलेला चाकरमान्यांना गावातील हा सण खुणावू लागला आहे.
गावागावातील ग्रामदेवतांच्या मंदिरांचे देव्हारे आकर्षक फुलांनी सजवले गेले आहेत. ग्रामदेवतेला दागिन्यांचा साज चढवला गेला आहे. ग्रामदेवतांच्या पालख्या खर्या कोकणचे सांस्कृतिक दर्शन घडवणासाठी सज्ज झाल्या आहेत.
दापोली तालुक्यातील बुरोंडी, महामाईनगर, शितलनगर, तेलश्वेरनगर, चंडिकानगर येथे भैरी ग्रामदेवतेच्या उत्सवातही हाच जल्लोष पाहायला मिळत आहे. ग्रामदेवतेच्या पालखीत देवाची रूप लावण्यापासून ती काढेपर्यंतचे सारे मान निश्चित केले आहेत . गावाचे हेच मानकरी वर्षानुवर्ष आपला मान जपत हा उत्सव साजरा करत आहेत. ग्रामदेवतेच्या मंदिरात चाकरमान्यांसह सारा गाव जमा होऊन देवाला गार्हाणे घालायलाही सुरुवात झाली आहे, अशी माहिती महामाईनगर येथील ग्रामस्थ जनार्दन गोवले यांनी दिली.
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळेमधील शिमगाही उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. येथील शिमागोत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे कालीका वाघजाई आणि कालकोबाच्या पालखीत रूप बसवली जातात. शिमगोत्सवात रूपे लागणं म्हणजे पालखी सजवणे हे स्वरुप असते. पालखी जौखंब्यात बसवून साड्यांची रूपं लावली जातात. सोन्या चांदीच्या दागिन्यांनी पालखी सजते आणि मग शिमग्यासाठी पालखी तयार होते.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
विविध प्रथा
कोकणातील प्रत्येक गावात शिमगोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रथा पाहायला मिळतात. वर्षानुवर्षांच्या निश्चित परंपरानुसार संपूर्ण गाव निश्चित दिवशी ग्रामदेवते समोर हजर रहतो. मिरजोळे कालिका आणि वाघजाई बांगड्या भरण्याचा मान गुरूवांना असतो..खास मुंबईहून हे मानकरी दरवर्षी न चुकता येथे उपस्थित होत असतात.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
धुळवडीपर्यंत कोकणी माणूस आपल्या ग्रामदेवतांचे उत्सव वर्षानुवर्षाच्या परंपरा आणि मान जपत साजरा करतो. गैर आणि अनिष्ट आहे, त्याचा नाश करण्याचा हा उत्सव ख-या अर्थाने कोकणच्या सांस्कृतिक वैभवाच दर्शन घडवतो. गावागावातील आपल्या अनोख्या परंपरा जपत कोकणी माणूस या उत्सवाच्या काळात आपल्या ग्रामदेवते समोर नतमस्तक होतो, अशी भावना अनंत गुरव या मानकर्यांनी व्यक्त केली.