सहकाराला जीवनाचा अविभाज्य घटक मानून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी तब्बल गेली ५१ वर्षे सहकारात काम करून कोकणात सहकार रुजविण्यात मोठे योगदान दिले. इतकेच नव्हे तर चिपळूण नागरीच्या माध्यमातून जनसेवा केली. सर्व समाज घटकातील गोर गरीब आर्थिक दुर्बल आर्थिक घटकासाठी ही संस्था सुभाषरावांच्या नेतृत्वाखाली आधारवड बनली आहे. विशेष म्हणजे वयाच्या ७५ व्या वर्षी देखील तरुणांना लाजवेल असे काम करताना दिसत आहेत. आता देखील तोच जोश, तोच उत्साह साहेबांकडे बघितल्यानंतर इतकी ऊर्जा, प्रेरणा सुभाषरावांकडे येते कुठून ? हा प्रश्न पडतो. सहकारातील यशस्वी वाटचालीत सुभाषराव चव्हाणांच्या अर्धागींनी सौ.-स्मिता चव्हाण यांची खंबीर साथ लाभली आहे. सहकारातील दीपस्तंभ चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाणांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करतांना चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अधिकारी, कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुभाषरावांचा वाढदिवस म्हणजे चिपळूण नागरीच्या यशस्वी वाटचालीचा आगळावेगळा संकल्प असतो. आज सुभाषरावांच्या वाढदिवसानिमित सहकार सभागृहाचे उद्घाटन व सभासदांच्या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर साहेबांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त थोडक्यात घेतलेला आढावा…
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा जन्म उभळे या गावी झाला. प्राथमिक शिक्षण उभळे या गावीच झाले. तर माध्यमिक शिक्षण मिलिंद हायस्कूल रामपूर येथे झाले. उभळे ते रामपूर असे आठ किलोमीटर अंतर रोज पायी ये- जा करीत त्यांनी या विद्यालयात आठवी ते अकरावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे घाटकोपर येथील झुनझुनवाला कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.- ही पदवी प्राप्त केली. या शिक्षणानंतर नोकरीच्या प्रयत्नात असतानाच उल्हासनगरच्या आर. के. तलरेजा कॉलेजमध्ये एम. ए. ला प्रवेश घेतला. त्याच दरम्यान सुभाषरावांना दोन नोकऱ्या मिळण्याची संधी आली. एक मुंबई नगरपालिकेत फायर ब्रिगेड मध्ये असिस्टंट स्टेशन ऑफिसर तर दुसरी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत इन्स्पेक्टर म्हणून परंतु सुभाषरावांना गावाकडची जन्मभूमीची ओढ असल्याने त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकरी स्वीकारली. जिल्हा बँकेच्या दापोली शाखेत इन्स्पेक्टर म्हणून नेमणूक देण्यात आली आणि १५ सप्टेंबर १९७१ रोजी सहकारी बँकेतील नोकरीस सुरुवात केली. हीच त्यांच्या आयुष्यातील सहकारी चळवळीशी जोडले जाण्याची वेळ. तिथपासून जी-जी संधी प्राप्त झाली. त्या- त्या संधीचे सुभाषरावांनी सोने केले आहे. दरम्यान, नोकरी करीत असताना स्मिता यांच्याशी विवाह झाला तर दुसरीकडे सहकाराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करण्यास सुरुवात केली.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रामाणिकपणे नोकरी केल्याने सुभाषरावांना बढती मिळत गेली. या कालावधीत काही गोष्टी त्यांच्या प्रकर्षाने लक्षात आल्या. यामध्ये कोकणातील भौगोलिक परिस्थिती व एक पिकाची शेती लक्षात घेता येथील शेतकऱ्याला शेती बरोबरच पूरक उत्पन्न देणारी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. तसेच शेती बरोबरच छोटे-मोठे व्यवसाय करू इच्छिणाऱ्यां गरजूंना सुलभ पद्धतीने अर्थ पुरवठा करणारी व्यवस्था असायला हवी की ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती होईल, याच हेतूने आपल्या नियंत्रणाखाली सहकाराच्या चाकोरीतून काम करणारी बिगरशेती पतसंस्था स्थापन करण्याचा सुभाषरावांनी निर्णय घेतला आणि १९ ऑक्टोबर १९९३ रोजी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली.
सुरुवातीपासूनच सुभाषरावांना सहकाराची आवड होती. कोकणात सहकार रुजत नाही, असे म्हटले जायचे. मात्र, सुभाषरावांनी केलेल्या अथक मेहनत, जिद्द, प्रयत्नातून कोकणात सहकार रुजू शकतो. हे गेल्या काही वर्षातील चिपळूण नागरीच्या वाटचालीतून सिद्ध केले आहे. यासाठी संस्थेच्या सभासदांनी दिलेली साथ, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वर्गाने घेतलेली मेहनत यामुळेच संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे, असे ते मानतात.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरीतील सगळे अनुभव चिपळूण नागरीच्या वाटचालीतील अनुभव उपयोगी आणत सर्वसामान्यांना बचतीची सवय लागावी, यासाठी मोठ्या ठेवी ठेवण्याबरोबरच १०० ते जमेल तितके रुपयांच्या ठेवींसाठी सुमारे ३१ ठेव योजना सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व ठेव योजनांना सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठेवी स्वीकारण्यांबरोबरच गरजूंना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याची स्वतंत्र कार्यपद्धती सुभाषरावांच्या नेतृत्वाखाली चिपळूण नागरीची यशस्वी वाटचाल सुरू आहे. ते कर्जदाराची स्वतः मुलाखत घेतात कर्ज मागणाऱ्याला कशासाठी कर्ज हवे आहे? किती हवे आहे? असे मोजकेच प्रश्न विचारून कर्ज मंजुरी देतात. यामुळे गरजू असो अथवा छोटे छोटे व्यवसाय करणारे कर्जदार असो या सर्वांसाठी चिपळूण नागरी एक आधार बनली आहे. यामुळेच चिपळूण नागरीचा कर्जदार संस्थेचे वेळेत कर्ज फेडतांना दिसत आहे. विशेष म्हणजे या कर्जाच्या आधारे कर्जदाराची गरज भागतेच तर बहुतांश कर्जदार स्वावलंबी झाले आहेत. हे सर्व कर्जदार सुभाषरावांना धन्यवाद देतात. यावरून सुभाषराव चव्हाण सर्वसामान्यांचे आधारस्तंभ बनले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या संकल्पनेतील कोकणातील शेतकऱ्यांना पूरक रोजगार देणाऱ्या दुग्ध व्यवसायाचे काम वाशिष्ठी डेअरी च्या माध्यमातून अंतीम टप्प्यात आले आहे. हा प्रकल्प कोकणातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
चिपळूण नागरीची (सांपत्तिक स्थिती ऑगस्ट २०२२ अखेर) सभासद संख्या १ लाख ३३ हजार ७१५, भाग भांडवल ६३ कोटी ५३ लाख, रुपये स्वनिधी १२८ कोटी १९ लाख रुपये, ठेवी ९५८ कोटी ८२ लाख रुपये, कर्ज ७७१ कोटी ९६ लाख रुपये पैकी प्लेज लोन ३३० कोटी ५७ लाख, सोने कर्ज २९७ कोटी ३२ लाख गुंतवणूक २९७ कोटी ५४ लाख रुपये, मालमत्ता ३० कोटी ८३ लाख, निव्वळ नफा मार्च अखेर १८ कोटी ७६ लाख रुपये ही आकडेवारी पाहता या संस्थेने सुभाषरावांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांना आपलेसे करून घेतले आहे. सुभाषरावांनी कर्ज वितरणामध्ये कोणताही भेदभाव ठेवलेला नाही. सर्व समाज घटकातील गोरगरीब आर्थिक दुर्बल छोटे-मोठे व्यवसायिक कर्जदाराची गरज ओळखून तात्काळ कर्ज उपलब्ध करून देऊन कर्जदाराची आर्थिक गरज भागवली आहे. सुभाषरावांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने आर्थिक व्यवहारातील व्यावसायिकता सांभाळीत असतांनाच माणुसकीच्या ओलाव्यातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे.
चिपळूण नागरीचे सुरुवातीला कार्यक्षेत्र रत्नागिरी जिल्हा मर्यादित होते. मात्र, सुभाषरावांच्या नेतृत्वाखालील या संस्थेची यशस्वी घोडदौड पाहता सहकार विभागाने या संस्थेच्या विस्तारास संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्रास परवानगी दिली. या संस्थेच्या आता ५० शाखा असून सर्व शाखांमध्ये यशस्वीपणे कारभार सुरू आहे. विशेष म्हणजे सुभाषराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी मेहनत घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात पतसंस्था आल्या. त्या इथे रुजल्या. मात्र, कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात शाखा सुरू करून यशस्वीपणे कारभार करणारी चिपळूण नागरी एकमेव पतसंस्था ठरली आहे. याचे सारे श्रेय संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाणांना जाते. या संस्थेमुळे थेट शेकडो सुशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. यामुळे चिपळूण नागरीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी सुभाषराव दैवत ठरले आहेत. या दैवताचा वाढदिवस म्हणजे सर्वांसाठी आनंदाची पर्वणीच असते. आजचा वाढदिवस आगळावेगळा आहे कारण सुभाषरावांचा आजचा वाढदिवस अमृतमहोत्सवी आहे. यामुळे सभासद, कर्जदार व हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव नेतृत्वाखाली सहकारात शेकडो कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. ते संस्थेच्या मेळाव्यात सहकाराविषयी उत्तम आपले म्हणणे मांडतात. तर सुभाषराव चव्हाण नेहमी म्हणतात, सहकार एक जीवन पद्धती आहे. सामाजिक विकासाला सहकाराशिवाय पर्याय नाही. सहकारात काम करणाऱ्याला या चळवळीत आनंद मिळतो. सहकारामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने ही चळवळ अधिक प्रभावशाली कशी होईल, यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे, अशी सुभाषरावांची धारणा आहे. सहकार रुजला पाहिजे, हा विचार उराशी बाळगून ते काम करीत आले आहेत.. म्हणूनच सुभाषराव चव्हाणांना सहकारातील दीपस्तंभ म्हटले तर वावगे ठरणार नाही. या सहकार महर्षीचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करतांना सर्वांना आनंद होत आहे. यानिमित्ताने चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाणांना दीर्घायुष्य मिळो, हीच सदिच्छा!