कोकण दौऱ्यात रामदास आठवलेंनी रायगड आणि रत्नागिरीतील गावांना दिल्या भेटी
दापोली, 12 जून : निसर्ग चक्रीवादळाने कोकण उध्वस्त झाले आहे. कोकण हे निसर्ग रम्य आहे येथील पर्यटन व्यवसाय; शेती; बागायती ; मच्छिमारांच्या बोटी; गावांमधील घरे; समाजमंदिरे उध्वस्त झाली आहेत. मात्र अद्याप वादळग्रस्त कोकणला शासनाने कोणतीही मदत दिलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण चे असून त्यांनी वादळात उध्वस्त झालेल्या कोकणला त्वरित मोठी मदत देऊन दिलासा द्यावा असे आवाहान करून वादळग्रस्तांना मदत देण्यात निर्णय घेण्यात विलंब करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर जनता नाराज असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
वादळग्रस्त कोकणच्या रायगड मधील माणगाव; रत्नागिरीतील मंडणगड आणि दापोली या तालुक्यांतील गावांना ना रामदास आठवले यांनी भेट दिल्या. मंडणगड मधील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे गाव असलेल्या आंबडवे या गावाची निसर्ग चक्री वादळाने हानी झाली आहे. त्या गावाला भेट देऊन पाहणी केली. येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात भेट देऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांरांच्या प्रतिमेला अभिवादन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीकलशाला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
रायगड मध्ये 6 जणांचा वादळाने मृत्यू झाला आहे. त्यांना केवळ प्रत्येकी 4 लाख सांत्वनपर मदत देण्यात आली ती मदत अल्प असून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर 10 लाख रुपये मदत घ्यावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. नुकसान झालेल्या गावांचे त्वरित पंचनामे करून रोख मदत तहसीलदार मार्फत द्यावेत. घर बांधणीसाठी दीड लाख रुपये देण्यात येणार असून ती रक्कम अपुरी आहे. त्यात वाढ करून 3 लाख रुपयांची मदत घरांची नुकसान भरपाई म्हणून द्यावी अशी मागणी आठवले यांनी केली.
भात शेती सारख्या शेतीच्या नुक्सान भरपाई साठी हेकटरी 50 हजार मदत अल्प असून हेकटरी 1लाख मदत द्यावी. आंबा; सुपारी; आदी फळबागांचे नुकसान भरपाई देताना 10 वर्षांची भरपाई द्यावी तसेच प्रत्येक झाडांचा सर्व्हे करून मदत द्यावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे. राज्य सरकार ने त्वरित रोख रक्कम वादळग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
केंद्र सरकार कडून वादळग्रस्तांना त्वरित मदत मिळवून देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर याना पत्र लिहिले असल्याचे रामदास आठवले म्हणाले. चक्रीवादळाने उध्वस्त झालेल्या कोकणात अद्याप वीज सुरू नाही; त्यामुळे पाणी नाही; दळण नाही अशी स्थिती आहे. मान्सून सुरू होत असल्याने त्वरित तुटलेली घरे उभी कारण्यासाठी शासनाने मदत द्यावी. घरावर छप्पर म्हणून पत्र्यांची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. या दौऱ्यात आठवले यांच्या समवेत कुमार जित आठवले; काकासाहेब खंबालकर;अशोक भालेराव; डी एम चव्हाण; दादासाहेब मर्चंडे; के दि कदम सिद्धार्थ कासारे; संजय पवार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.