मुंबई : बातम्यांना वाहिलेल्या आणि पत्रकारांची वृत्तसंस्था म्हणून समजल्या जाणार्या कोकणवृत्तसेवा या संकेतस्थळाचे लोकार्पण देशाच्या प्रजासत्ताकदिनी ज्येष्ठ पत्रकार आणि महावॄत्तसेवा या वृत्तसंस्थेचे मुख्य संपादक कुमार कदम यांच्या हस्ते करण्यात आले. मुलुंडमधील श्री तारा या हॉटेलमध्ये सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी संकेतस्थळाचे उद्धाटन झाले. यावेळी कोकणवृत्तसेवेचे मुख्य संपादक प्रशांत गायकवाड, संपादक रुपेश तांबे, पत्रकार काशिनाथ म्हादे, अक्षय गायकवाड, भूषण भिसे उपस्थित होते.
दररोज असंख्य घडामोडी आपल्या अवतीभवती होत असतात. वाचकांपर्यंत त्या पोहचणे महत्वाचे असते. त्यासाठी सोशल मिडिया हे प्रभावी माध्यम ठरू शकते आणि कोकणवृत्तसेवा हे संकेतस्थळ ते माध्यम ठरू शकेल, असा विश्वास कुमार कदम यांनी लोकार्पणावेळी व्यक्त केला. कोकणवृत्तसेवा कोकणातील प्रत्येक खेड्याशी जोडली जावी आणि तेथील माहिती, समस्या, संस्कृती या संकेतस्थळाच्या माध्यमातून समाजासमोर यावी, असे मत कदम यांनी व्यक्त केले.
कोकणाला लाभलेले समुद्र किनारे यांचे संरक्षण करणे, हा कोकणवृत्तसेवा या संंस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्या दृष्टीनेच संस्थेची वाटचाल सुरू राहील. आजपासून ही वृत्तसेवा वाचकांसाठी खुली होत आहे. देशातील विविध बातम्यांबरोबरच कोकणातील बातम्या वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे संपादक रुपेश तांबे यांनी सांगितले.