रत्नागिरी :कोकणातल्या गणेशोत्सवाची सुरवात भाद्रपद प्रतिपदेपासून झाली आहे. कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं आज आगमन झालं. संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधल्या चौसोपी वाड्यातील पंत जोशी यांचा हा गणपती नवसाला पावणारा म्हणुन ख्याती आहे. पावणे चारशे वर्षापासून पारंपारिक वाद्याच्या साथीने हा गणपती आणला जातो. घोड्यावर आरुढ झालेली दिमाखदार मुर्ती डोक्यावरुन घेवून हि मिरवणुक देवरूख शहरातून निघते. पावणे चारशे वर्षांची परंपरा असणारा देवरुख मधला हा सार्वजनिक गणपती म्हणुन ओळखला जातो. देवरुख मधल्या जोशी यांना दृष्टांत देवून या गणपतीची स्थापना करण्यात आली. मोरगाव या अष्टविनायकाच्या ठिकाणाहून या गणेशमुर्तीला प्रसन्न करुन इथं आणलं जातं. सध्या हि मुर्ती पुजेसाठी न बसवता घोड्यावर आरुढ झालेली मुर्ती जोशी यांच्या चौसुपी वाड्यात बसवली जाते. अत्यंत देखण्या अशा या गणपतीची मिरवणुक देवरुख शहरातून निघते. चौघ़डे तुतारी, ढोल ताशांच्या पारंपारिक वाद्याच्या जोडीला या गावातून निघणाऱ्या गणपतीचा थाट वेगळाच असतो. गणपतीची मुर्ती आणि त्यासोबत या मुर्ती समोर ठेवण्यात येणारे घोडेस्वार, रिद्धी सिद्धी अशा मुर्ती डोक्यावर घेवून त्यांची मिरवणुक काढली जाते.उजव्या सोंडेचा असा हा गणपती आहे. प्रचंड कडक आणि सोवळ्यातला हा गणपती आहे. या गणपतीच्या बाजुला रिद्धी सिद्धी उभ्या असतात. नवसाला पावणारा गणपती म्हणुन याची ओळख आहे. त्यामुळे मुंबईकरांसह देवरुखवासीय मोठ्या संख्येनी या सोहळ्याला उपस्थिती लावतात.