रत्नागिरी, (आरकेजी) : कोकण रेल्वे मार्गावर सौंदळ या नवीन रेल्वे स्थानकाचे उद्घाटन आज केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. व्हिडीओ लिंकद्वारे उद्घाटन करण्यात आले. विलवडे आणि राजापूर रोड स्थानकांदरम्यान सौंदळ आहे.
सकाळी साडेअकराच्या सुमारास पणजी(गोवा) येथे हा कार्यक्रम झाला. राजापूर तालुक्याला सोयीस्कर ठरेल अशा सौंदळ रेल्वे स्थानकाचा प्रश्न मागील वर्षी मार्गी लागला होता. प्रभू यांच्यामुळे या स्थानकाला मान्यता मिळाली. भूमिपूजन पार पडल्यानंतर लगेचच बांधकामाला सुरूवात झाली होती.
या भागातील ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर सौंदळ रेल्वे स्थानकाची निर्मिती झाल्याबद्द्ल आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या स्थानकाचा ओनी, पाचल, पटवले, सोलवडे, गोठने, यलावन, ओजर, तुलवडे आदि गावांतील सुमारे ३५ हजार ग्रामस्थांना लाभ होणार आहे.
सौंदळ स्थानकावर ५०१०५/५०१०६ सावंतवाडी-दिवा-सावंतवाडी आणि ५०१०१/५०१०२ रत्नागिरी-मडगांव-रत्नागिरी या पॅसेंजरला थांबा देण्याचा प्रस्ताव आहे.