रत्नागिरी (आरकेजी): रेल्वे रुळावर माती आल्याने मुंबई ते रत्नागिरी या मार्गावरील वाहतूक तब्बल पाऊण तास कोलमडून पडली होती. काहीच वेळात रुळावरील माती बाजूला केल्याने कोकण रेल्वची वाहतूक हळूहळू पर्वपदावर येऊ लागली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील दिवाणखवटी येथे रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास रुळावर माती आली. रेल्वेच्या ही बाब लक्षात येताच रुळावरील माती काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. यावेळी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी दोन्ही मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. तर काही गाड्यांना जवळच्या स्थानकात थांबा दिला. नेत्रावती एक्सप्रेसला दिवाणखवटी स्थानकातच थांबवली. तर खेड रेल्वे स्थानकात राजधानी एक्सप्रेस, कामथेमध्ये सावंतवाडी-पनवेल गणपती स्पेशल आणि मडगाव-दादर जनशताब्दी एक्सप्रेस व रत्नागिरी येथे बिकानेर एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्यात आल्या होत्या.
दरम्यान, जवळपास पाऊण तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. मात्र रेल्वेच्या अथक प्रयत्नांनंतर सुमारे सव्वा तासाने राजधानी एक्सप्रेस ही पहिली गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. हळूहळू कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येत आहे. सोमवारी सकाळपर्यंत वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली.