- मुंबई: मध्य रेल्वेने युरोपच्या ‘व्हिस्टाडोम’ धर्तीवर कोकण मार्गावरील निसर्गाचे सौंदर्य मनमुराद न्याहाळता यावे, यासाठी दादरहून सोडण्यात येणाऱ्या मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये ‘व्हिस्टाडोम’ हा आधुनिक कोच बसविण्यात आला आहे. रविवारी या कोचचे अनावरण करण्यात आले.
रविवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसीचे) पश्चिम विभाग समूह व्यवस्थापक अरविंद मालखेडे, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड आदी यावेळी उपस्थित होते.
या कोचच्या डब्यातील छतामधूनही निसर्ग दिसणार आहे. खिडक्यांचा आकारही मोठा असून आसनात बसून आसमंताचा नजारा अनुभवता येणार आहे. पारदर्शक डबा, ४० आसने, आरामदायी खुर्ची, पाय ठेवण्यासाठी अधिक मोकळी जागा, प्रत्येक आसनाच्या मागे ९ इंच एल सीडी स्क्रीन,मोबाईल चार्ंजग, सीसी टीव्ही आदी सुविधा आहेत. बोगीच्या मध्यभागी छताला दोन स्क्रीन असून यात जीपीएस सुविधा ही पुरविले आहे. पावसाळ्यापर्यंत दादरहून १८ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सुटेल. तर परतीच्या मार्गावर १९ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत मंगळवार, शुक्रवार व रविवारी धावेल. मात्र पावसानंतर ही गाडी बुधवार वगळून आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.
स्थानके आणि तिकीट दर
दादर ते पनवेल – ६३० रु., दादर ते चिपळूण- १२१५ रु., दादर ते रत्नागिरी – १४८० रु., दादर ते कणकवली – १८७० रु., दादर ते कुडाळ – १९५० रु., दादर ते थिविम – २१२० रु., दादर ते मडगाव – २२३५ रु., पनवेल ते चिपळूण – १०७५ रु., पनवेल ते रत्नगिरी – ११३० रु., पनवेल ते कणकवली- १७५० रु., पनवेल ते कुडाळ -१८२५ रु., पनवेल ते थिविम- १९९५ रु., पनवेल ते मडगाव-२२३५ रु.