
रत्नागिरी,(आरकेजी) : कोकणकिनारपट्टीवर विकासपर्वाला सुरूवात झाली असून सागरमाला प्रकल्पांतर्गत आज जयगड बंदराचा लोकार्पण सोहळा पार पडला. हे बंदर देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बंदराचा लोकार्पण सोहळा झाला. “जयगड बंदर लोकार्पण सोहळा ऐतिहासिक क्षण आहे. या बंदरामुळे विकासाचे नवे पर्व सुरु होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय रस्ते विकास व नौकानयन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, बंदरे व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, आमदर उदय सामंत, जिंदाल समुहाचे सज्जन जिंदाल, व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन व्ही.के.शर्मा यावेळी उपस्थित होते.
जागतिक पातळीवर जलवाहतुकीस अनन्य साधारण महत्व आहे. जलवाहतुकीच महत्व ओळखूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरमाला हा कार्यक्रम जाहीर केला असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, बंदर विकासाबरोबरच बंदराला जोडणारे रेल्वे मार्ग, रस्ते यांचाही विकास करण्याचे नियोजन आहे. यामुळे आयात,निर्यातीचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. जयगड बंदर ते डिंगणी या रेल्वे मार्गाचा एस.पी.व्ही. च्या माध्यमातून देशातला पहिला करार झाला त्याची आज अंमलबजावणी होत आहे याचा मला आनंद होत आहे.
सज्जन जिंदाल यांच्या कार्याचा गौरवपूर्व उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, देशाला आज अशा खंबीर भूमिका,विकासाचा ध्यास घेतलेल्या उद्योजकांची गरज आहे. ते पुढे म्हणाले ग्रीन रिफायनरी कोकणात साकारत आहे. कोकणाला विकासाची तडफ आहे आणि ही तडफच कोकणाच्या उत्कर्षास सहाय्यभूत ठरणार आहे.
देशाला महासत्ता बनविण्यासाठी बंदर विकास महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले की, बंदर विकासाबरोबरच बंदराला जोडणारे रस्ते व रेल्वेमार्ग विकसित झाल्याने मोठया प्रमाणावर जलद वाहतुकीस चालना मिळण्याबरोबरच रोजगार निर्मितीसही मोठा वाव मिळणार आहे. रत्नागिरीचा विमानतळ नेव्हीच्या मदतीने विकसित होणार असून शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळही लवकरच सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
रस्ते विकास व नौकानयनमंत्री नितीन गडकरी यावेळी बोलताना म्हणाले की, जयगड बंदर हे देशाच्या सागरमाला प्रकल्पाचाच भाग असून या बंदराच्या विकासामुळे देशाच्या प्रगतीत भर पडणार आहे. २ लाख टन माल वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या जहाजामुळे वाहतुकीचा खर्च कमी होणार अससल्याने याद्वारे राज्याची आर्थिक प्रगती होणार आहे. जेएनपीटी बंदराच्या धर्तीवर देशातील बंदराचा विकास केला जाईल. यामुळे आयात, निर्याती मध्ये वाढ होऊन जीवनावश्यक वस्तुच्या किंमती कमी होतील. तसेच उद्योग व रोजगार वाढणार आहेत. राज्याला लाभलेल्या समुद्र किनाऱ्याचा विकास करुन पर्यटनाला चालना देण्यात येईल. तसेच जलवाहतूक ही इतर वाहतुकीच्या मानाने किफायतशीर असल्याने देशातील सागरी तसेच नद्यांच्या जलवाहतुकीचा विकास करण्यात येईल. त्यासाठी राज्यातील ११२ नद्या निवडण्यात आल्या आहेत.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले की, राज्यात रेल्वे मार्गाची कामे मोठयाप्रमाणात होत आहेत. बंदराला जोडणाऱ्या रेल्वेमार्गामुळे स्थानिका परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी सांगितले की, जिंदाल समुहाचा कोकणाच्या विकासात महत्वाचा वाटा असून समुहाच्या विविध प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळाला आहे.
मेकॅनाइज्ड कोस्टल बर्थ ६ ए चे उद्घाटन यावेळी बंदर राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते रिमोटद्वारे करण्यात आले. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या हस्ते जयगड बंदर ते निवली या ४२ कि.मी. रस्त्याचे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते जयगड बंदर लोकार्पण सोहळा संपन्न झाला. जयगड बंदर ते डिंगणी या नियोजित रेल्वे मार्गाची यावेळी चित्रफीत दाखविण्यात आली. हा रेल्वे मार्ग ३३.७० कि.मी.लांबीचा असून या मार्गावर २३ पूल व ६ बोगदे आहेत. ४.७३ किलोमीटरचा सर्वात जास्त लांबीचा बोगदा या रेल्वे मार्गावर आहे.
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलनानंतर शास्त्रीय गायिका भानुमती शर्मा यांनी गणेश वंदना सादर केली. शेवटी व्यवस्थापकीय संचालक, कॅप्टन व्ही.के.शर्मा यांनी आभार मानले. समांरभाचे सूचसंचलन हेमंत बर्वे, श्रीमती मेडोना यांनी केले.
समारंभास आमदार जयंत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वाती सावंत, अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी, जिल्हाधिकारी प्रदिप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक तसेच जयगड पंचक्रोशीतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, जिंदाल समुहाचे अधिकारी, कर्मचारी, कोकण रेल्वेचे अधिकारी आदि उपस्थित होते.















