मुंबई : प्रख्यात शास्त्रीय संगीत गायिका किशोरीताई आमोणकर यांचे सोमवारी रात्री मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांना गानसरस्वती असे आदराने संबोधले जात असे. ८४ वर्षांच्या किशोरीताई काही दिवसांपासून आजारी होत्या.
त्यांचा गायन प्रकार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे होते आणि त्या जयपूर घराण्यातून होत्या. मुंबईला १० एप्रिल १९३२ रोजी त्यांचा जन्म झाला. प्रख्यात गायिका मोगूबाई कोर्डीकर या त्यांच्या आई होत. त्यामुळे घरातच गायनकलेचे ज्ञान मिळाले. संगीत घराण्यांतील गुरूंकडूनही त्यांना मार्गदर्शन मिळाले. एलफिन्स्टन महाविद्यालयातून त्यांचे शिक्षण झाले. पती रवी हे अध्यापन क्षेत्रात कार्यरत होते. सन १९९२ मध्ये त्यांचे निधन झाले.
सन १९५० च्या दरम्यान व्यावसायिक कारकीर्दीस किशोरीताईंनी सुरुवात केली. त्यांनी हिंदी चित्रपटांत पार्श्वगायन आणि संगीत दिग्दर्शनही केले होते. ख्याल गायकीसह ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना त्यांनी प्रभावीपणे सादर केले. ‘स्वरार्थरमणी – रागरससिद्धान्त’ हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ त्यांनी लिहिला आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना कला क्षेत्रातील मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. यासह पद्मभूषण, संगीत सम्राज्ञी, पद्मविभूषण आदी मानाचे पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
महान शास्त्रीय गायिकेला आपण मुकलो : मुख्यमंत्री
प्रयोगशीलता व संवेदनांना जपणाऱ्या एका ख्यातनाम आणि महान शास्त्रीय गायिकेला आपण मुकलो आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या आप्त-रसिक चाहत्यांना मिळो. अशी प्रार्थना करतो, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून किशोरीताईना वाहिली आहे. किशोरीताई भावप्रधान गायिका होत्या. गीत किंवा भजन, श्रोत्यांना त्यांनी श्रवणानंदच दिला. येथेच न थांबता संगीतावरील ग्रंथही त्यांनी लिहिला, असेही मुख्यमंत्री म्हणाले.