रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील श्री कुसुमेश्वर महालक्ष्मी ब्रह्मवृंद उत्सव मंडळातर्फे महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव बुधवार (ता. 10) ते 18 ऑक्टोबरपर्यंत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तनांचे आयोजन केले आहे.
घटस्थापनेला सकाळी षोडशोपचार पूजा, अभिषेक, दुर्गासप्तशती पाठवाचन, रात्री 8 वाजता भजने, 9 वाजता आरत्या, भोवत्या, मंत्रपुष्प व कीर्तन होईल. या दिवशी रात्री देवरुख येथील हभप कुमार भाट्ये यांचे दुर्वांकुर आख्यान विषयावर कीर्तन होईल. 11 ते 13 ऑक्टोबरला रात्री पुण्यातील हभप रोहिणी परांजपे यांचे संत जनाबाई, द्रौपदी सांत्वन, येसाजी कंक या विषयांवर कीर्तन होईल. 14 ला रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होतील. 15 व 16 ला कुमार भाट्ये यांचे कनकाई चरित्र व सुधन्वा चरित्र या आख्यान विषयावर कीर्तन होईल. 17 व 18 ऑक्टोबरला कुर्धे येथील हभप स्पृहा चक्रदेव या स्वामी विवेकानंद व संत एकनाथ यांच्यावर कीर्तन करतील. भाविकांनी उत्सवात लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष विजय वैद्य, उपाध्यक्ष नितीन मोने, चिटणीस गजानन सहस्रबुद्धे यांनी केले आहे.