रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना पक्षाने जबाबदारी दिल्यास मी लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ लढवणार असल्याची इच्छा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांनी व्यक्त केली. किरण सामंत एक नावाजलेलं व्यक्तिमत्त्व तसेच राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व आहे. तळागाळातील गावातील ग्रामस्थांपासून शाखाप्रमुखांपासून वरिष्ठांपर्यंत स्वतःच्या हिंमतेवर तयार झालेलं वेगळ रसायण आहे. आपल्या व्यवसायिक कामातून वेळ काढून आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम हे आपलं काम समजून ते करत असतात. किरण सामंत हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांचे मोठे बंधू असून त्यांनी त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी विकास कामांच्या माध्यमातून आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. येणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातून शिवसेनेचे तसेच इतर पक्षाचेही पदाधिकारी आणि कार्यकर्ते किरण सामंत यांनी निवडणूक लढवावी यासाठी ते जोर लावत आहेत. किरण सामंत यांचे सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरीमध्ये ही मोठा वर्चस्व असून या दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि विविध पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत. शिवसेना शिंदे गटातून किरण सामंत यांना उमेदवारी मिळाल्यास तीन लाख मतांच्या लीडने ते निवडून येतील असा अंदाजही मीडिया कडून नोंदवला गेला आहे.
राजकारणाच्या पलीकडे किरण सामंत यांचे वैयक्तिक संबंध, अनेक पक्षातील पदाधिकारी तसेचं गावागावातील लोकांपर्यंत आहेत. दांडगा अनुभव,कामाची असलेली वेगळी पद्धत,असलेला स्वतःचा स्वभाव,वागणूक, तशीच आर्थिक क्षमता, जनतेशी असलेला दांडगा जनसंपर्क, त्यांच्या मागे उभी असलेली युवकांची मोठी टीम, या सगळ्यांचा विचार करता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा किरण सामंत यांना जिंकण्यासाठी सहज सोपा आहे.
ज्या पद्धतीने रत्नागिरीमध्ये किरण सामंत काम करत आहेत, त्याच्या दोन पटीने अधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही ते कार्यरत असून विविध ठिकाणी त्यांनी आपली कार्यालयही स्थापन केली आहेत. त्या कार्यालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवा आणि जनकल्याणांच्या योजना गेल्या अनेक वर्ष राबवण्याचे काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. किरण सामंत हे लोकांच्या मनातलं असलेलं नाव अगदी लोकसभेपर्यंत पोहोचावं यासाठी तळागाळात ही जोरदार मागणी होत आहे. त्या अनुषंगाने जर पक्षाने लोकसभा निवडणूक लढवण्याची जबाबदारी दिली तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे यावेळेस किरण सामंत यांनी सांगितले.
त्यांनी जाहीर केलेल्या इच्छेमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. त्यांनी जाहीर केलेल्या इच्छे नंतर कार्यकर्ते जोमात कामाला लागतील यात शंका नाही.