रत्नागिरी (आरकेजी): सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे लाखो पर्यटकांनी कोकणची वाट धरली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी किनारे पर्यटकांनी फुल्ल झालेले पाहायला मिळत आहेत.
चौथा शनिवार लगेचच रविवार आणि सोमवारी नाताळची सुट्टी, अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे फिरायला जाणाऱ्यासाठी एक पर्वणीच. त्यातच सध्या कोकणात पडत असलेली गुलाबी थंडी असा दुग्धशर्करा योग जळून आल्यामुळे अनेकांनी कोकणची वाट धरली आहे. कोकणचं सौंदर्य प्रत्येकाला खुणावतंच.. निळाक्षार समुद्र किनारा आणि इथलं सौदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करतात, त्यामुळे या सलग सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कोकणात दाखल झालेत. परदेशी पाहुण्यांनीही समुद्र किना-यांनाच जास्त पसंती दिलीय, त्यामुळेच समुद्र किना-यांवर पर्यटकांनी रेलचेल वाढली आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी, गणपतीपुळे, वेळणेश्वर, दापोली, हर्णै, गुहागर असे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुल्ल झाले आहेत.
समुद्राच्या पाण्यात भिजण्याची मज्जा अनेक पर्यटक घेताना दिसत होते. बच्चे कंपनी बरोबरच त्यांचे पालक हि समुद्रकिनार्यावर पाण्यात मस्त बागडताना दिसत होते. कोकणातील दूरपर्यंत पसरलेले आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना इथ आकर्षित करतात. गोवा आणि मुंबई यांच्या मध्यावर असलेल्या कोकणच्या सौदर्याची भुरळ पर्यटकांना पडत असते. त्यामुळे पर्य़टकांची पावलं आपसूकच कोकणच्या दिशेने वळताना दिसतात.