पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘किल्ले रायगड’ वर पन्नास वर्षांपूर्वी केलेला दुर्मिळ लघुपट पाहण्याची संधी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने चित्रपट रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. कोल्हापूरचे चित्रपट निर्माते माधव शिंदे यांनी बरोबर पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे २७ नोव्हेंबर १९६७ रोजी या लघुपटाची निर्मिती केली होती त्याचेच औचित्य साधून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या खास उपस्थितीत सोमवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (लॉ कॉलेज रस्ता) चित्रपटगृहात या लघुपटाचे प्रदर्शन केले जाणार आहे.
कोल्हापूर चित्रनगरीच्या खास पठडीत तयार झालेले आणि ‘शिकलेली बायको’, ‘गृहदेवता’, ‘धर्मकन्या’ यासारखे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित करणारे माधव शिंदे यांनी हा लघुपट दिग्दर्शित केला असून मंगेशकर कुटुंबांच्या ‘महालक्ष्मी चित्र’ ने त्याची निर्मिती केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात रायगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे हे लक्षात घेऊन दिग्दर्शक माधव शिंदे यांनी या लघुपटात ‘किल्ले रायगड’ चे संपूर्ण अंतरंग उलगडून दाखविले आहेत. सुप्रसिद्द्ध इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या खास शैलीतील निवेदनाच्या पार्श्वभूमीवर ‘किल्ले रायगड’ चे हे अंतरंग इतिहासप्रेमी नागरिकांना निश्चितच आवडेल यात शंका नाही.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सौजन्याने तसेच डॉ. रवी लोहोकरे आणि अनिल दामले यांच्या सहकार्याने ‘किल्ले रायगड’ लघुपटाची ही दुर्मिळ प्रिंट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाली. त्यावेळी तिची अवस्था अतिशय खराब होती परंतु राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने तांत्रिक सोपस्कार करून ती पूर्ण प्रिंट प्रदर्शनासाठी चांगली केली असून यानिमित्ताने पन्नास वर्षांपूर्वीच्या गाजलेल्या लघुपटाचे पुनरुज्जीवन केले आहे. या लघुपटाचे प्रदर्शन सर्व चित्रपट रसिकांसाठी खुले असून यानिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवाजी महाराज आणि ‘किल्ले रायगड’ यांच्यावर मौलिक विचार ऐकण्याची संधीही मिळणार आहे.